सदनिकेच्या नावावर तरुणाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 04:54 PM2023-02-25T16:54:41+5:302023-02-25T16:55:55+5:30
नालासोपारा पोलिसांनी केली कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): सदनिकेच्या नावावर २४ वर्षीय तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या व फरार इस्टेट एजंट आरोपीला शुक्रवारी रात्री पकडण्यात नालासोपारा पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीने कोणाची सदनिकेच्या नावावर फसवणूक केली असेल तर त्यांनी कागदपत्रांसोबत पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आव्हान नालासोपारा पोलिसांनी केले आहे.
भाईंदरच्या संकल्प बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रघुनंदन यादव (२४) या तरुणाची सदनिकेच्या नावावर फसवणूक केली होती. आरोपी रियल इस्टेट एजंट सचिन तरकचंद गाला (४०) याने ३ फेब्रुवारी २०२० मध्ये श्रीप्रस्थातील ड्रीम टॉवरमध्ये २२ लाख ७५ हजार रुपयांना सदनिकेचा व्यवहार केला होता. सदर व्यवहारापोटी रघुनंदन याच्याकडून रोख व धनादेशद्वारे ५ लाख ६१ हजार रुपये घेतले. उर्वरित रकमेचे लोन करून देतो असे आश्वासन देऊन त्यांचे कागदपत्रे घेऊन आशापुरा रियालिटी याच्या पावत्या दिल्या होत्या. ठरलेला सदनिका खरेदीचा व्यवहार पूर्ण केला नाही व घेतलेली रक्कम परत न करता सदनिका खरेदीच्या व्यवहारात विश्वासघात करून फसवणूक केली होती. रघुनंदन याने ८ जुलैला नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. आरोपी तेव्हापासून फरार होता. शुक्रवारी रात्री त्याला पोलिसांनी पकडून अटक केली आहे.
तरुणाच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला शुक्रवारी पकडून अटक केले आहे. शनिवारी वसई न्यायालयात आरोपीला हजर केल्यावर सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - राहुल सोनवणे (पोलीस निरीक्षक, गुन्हे, नालासोपारा पोलीस ठाणे)