कोविड रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला घाटंजीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 08:41 PM2021-02-10T20:41:31+5:302021-02-10T22:28:46+5:30

Crime news: शहर गुन्हे शाखेची धाडसी कारवाई, आरोपी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात

accused, who escaped from Covid Hospital, was arrested from Ghatanji | कोविड रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला घाटंजीतून अटक

कोविड रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला घाटंजीतून अटक

googlenewsNext

अमरावती : खूनाच्या गुन्ह्यात अमरावती मध्यवर्ती कारवागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याला उपचाराकरीता कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र येथून तो संधी साधून पळून गेला होता. सदर आरोपीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथून बुधवारी अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शेख सलमान शेख अहमद कुरेशी (२५, रा. कळ रोड रहीमनगर, यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

त्याला यवतमाळ शहर येथील खूनाच्या गुन्ह्यामध्ये २० ऑगस्ट २०२० रोजी जन्मठेपेची शिक्षा झाल्याने तो अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता. जेलबंद असताना त्याला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला २० जानेवारी २०२१ रोजी येथील सुपर स्पेशालिटीतील कोविड रूग्णालयात उपचाराकरीता ठेवण्यात आले होते. मात्र त्याने येथून २८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ९ च्या सुमारास पळ काढला. त्याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसानी भादविची कलम २२४ नुसार गुन्हा नोंदवून त्याचा पथकाव्दारे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करीत असताना आरोपी हा घाटंजी येथे असल्याचे माहिती मिळाली. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पीएसआय राजकिरण येवले, पोलीस हवालदार राजु आप्पा बाहेनकर, गजानन ढेवले, दिनेश नांदे, निवृत्ती काकड, चालक प्रशांत नेवारे यांच्या पथकाने आरोपीस घाटंजी येथून शिताफीने अटक केली.
 

कसा पळाला गुन्हेगार?
सदर गुन्हेगार हा कोविड वार्डाच्या बाथरूमच्या खिडकीमधून पाईपव्दारे खाली उतरून त्याने पलायन केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्याने बडनेरा, भुसावळ, नागपूर व नंतर घाटंजी येथे तो आला. असे आरोपीने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या सदर धाडसी कारवाईचे कौतूक होत आहे.

Web Title: accused, who escaped from Covid Hospital, was arrested from Ghatanji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.