बोगस प्रमाणपत्रावर पोलिसात भरती झालेल्या युवकाचा पर्दाफाश
By अविनाश साबापुरे | Published: May 20, 2023 08:00 PM2023-05-20T20:00:42+5:302023-05-20T20:02:27+5:30
दराटी पोलिसांत गुन्हा दाखल, प्रकल्पग्रस्त असल्याचा बनाव
अविनाश साबापुरे, उमरखेड (यवतमाळ) : प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून पोलिस भरतीत पात्र ठरलेल्या एका २४ वर्षीय युवकाचा दराटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. किशोर किसन तोरकड (२४) रा. बोरी (वन) असे आरोपी युवकाचे नाव आहे.
त्याने प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र जोडून ३० नोव्हेंबर २०२२ रोजी यवतमाळ येथील पोलिस भरतीत अर्ज केला होता. चाचणीत तो उत्तीर्ण झाल्यानंतर १७ मे २०२३ रोजी त्याचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा अंदाज यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अनिकेत पांडे यांना आला. त्यानंतर १९ मे रोजी त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर लिपिक पांडे यांच्या तक्रारीवरून दराटी पोलिस ठाण्यात ४२० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ठाणेदार भरत चपाईतरकर, जमादार केंद्रे यांनी अधिक तपास सुरु केला आहे.