दुचाकी अन् रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला अटक; ४ दुचाकी व ३ रिक्षा हस्तगत, नालासोपारा पोलीसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 05:44 PM2022-11-30T17:44:13+5:302022-11-30T17:45:10+5:30
नालासोपारा एस.टी. डेपो येथे हँडल लॉक केलेली दुचाकी चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल होता.
- मंगेश कराळे
नालासोपारा:- दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून पोलिसांनी सात गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या ४ दुचाकी व ३ रिक्षा हस्तगत केल्या आहेत. नालासोपारा पोलिसांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नालासोपारा एस टी डेपो येथे हँडल लॉक केलेली दुचाकी चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल होता. तसेच दुचाकी चोरीचे अनेक गुन्हेही दाखल आहेत. दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपीकडे चोरीची दुचाकी असून तो विकण्यासाठी नालासोपारा स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
स्टेशन परिसरात पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी संजय यादव (२९) याला रविवारी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ तपास केल्यावर एस टी डेपो येथील दुचाकी चोरल्याचे त्याने कबूल केले आहे. आरोपी पोलीस कोठडीत असतांना त्याचेकडे केलेल्या कोैशल्यपूर्ण तपासात त्याने आणखी वसई व मुंबई परिसरातून दुचाकी व रिक्षा चोरी केल्याची कबूली दिली आहे.
आरोपीकडून पोलिसांनी चोरीच्या ४ दुचाकी व ३ रिक्षा असा एकूण ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडीत म्हस्के, अमोल तळेकर, पोलीस हवालदार किशोर धनु, पोलीस नाईक अमोल तटकरे पोलीस शिपाई कल्याण बाचकर, राजेश नाटुलकर यांनी केलेली आहे.
१) ४ दुचाकी आणि ३ रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून सात गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपी पोलीस कस्टडीत असून त्याचा ताबा इतर पोलिसांना देणार आहेत. - विलास सुपे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)