रिक्षा, दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अटक; तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 06:41 PM2023-04-15T18:41:25+5:302023-04-15T18:41:44+5:30
५ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या चार रिक्षा हस्तगत
- मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : रिक्षा आणि दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या चार रिक्षा आणि एक दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळाल्याचे तुळींज पोलिसांनी शनिवारी सांगितले.
विरार वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एम के सूर्यवंशी यांनी तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आनंद मोरे यांना संपर्क साधून बनावट नंबर प्लेटचा वापर करून रिक्षा चालवताना मिळून आल्याचे सांगितले. त्या रिक्षेच्या चोरीबाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना दिली. पोलीस हवालदार मोरे आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. शिशकुमार गुप्ता याच्याकडे ही चोरीची रिक्षा मिळून आली. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर ती रिक्षा त्याचा मित्र प्रकाश त्रिवेदी याच्याकडून घेतल्याचे सांगून आणखी दोन चोरीच्या रिक्षा त्याने व त्याचा मित्र राकेश याने विरार येथील रिक्षावाल्यांना विक्री केल्याचे सांगितले.
तुळींज आणि वाहतूक पोलीसांनी दोन्ही रिक्षा जप्त करून चेसिस नंबरची माहिती घेतल्यावर विरार आणि तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. रिक्षाचा पंचनामा करून आरोपी शिशकुमार याला अटक केली. गुन्ह्याचे तपासा दरम्यान शिशकुमार याचा साथीदार प्रकाश त्रिवेदी उर्फ मारवाडी याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन त्याला मुंबई येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक रिक्षा आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, म्हाळू आव्हाड, दशरथ वाव्हूळे, उमेश वरठा, आशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, छबरीबन, राऊत तसेच विरार वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सूर्यवंशी, पोलीस हवालदार संतोष चकोर, योगेश भारुडे यांनी केली आहे.