दोघांवर ऍसिड हल्ला; पुरुषाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 11:03 AM2019-05-31T11:03:37+5:302019-05-31T11:04:44+5:30
जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलवरून मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास जेवण करून मोटारसायकलवरुन घरी परतत असताना कोणत्यातरी अनोळखी आरोपीने दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऍसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात पुरुषाचा मृत्यू झाला असून जखमी महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. वालीव पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा हत्या, हत्येचा प्रयत्न अनोळखी आरोपी विरोधात दाखल केला असून तपास करत आहे.
मुंबईच्या दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा परिसरात राहणारे अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (41) आणि सिमा विश्वकर्मा (38) हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मंगळवारी रात्री मोटारसायकल वरून गेले होते. जेवण झाल्यावर रात्री अडीचच्या दरम्यान मोटार सायकलवरून घरी परतण्यासाठी निघाल्यावर रस्ता क्रॉस करताना वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंप जवळील डिव्हायडर येथे थांबले असताना कोणत्यातरी कारणावरून अनोळखी आरोपीने दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ऍसिड फेकुन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अविनाश तिवारी यांचा मृत्यू झाला असून सिमा ह्या गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. या ऍसिड हल्ला कोणी व का केला याचा शोध घेत आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान वालीव पोलिसांसमोर उभे टाकले आहे.