सावनेरात महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 05:39 AM2020-02-14T05:39:35+5:302020-02-14T05:40:06+5:30

तिघी जखमी : दारुड्या युवकाचे नशेत कृत्य, नागरिकांनी दिला चोप

Acid attack on a female doctor in the savner | सावनेरात महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडहल्ला

सावनेरात महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडहल्ला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सावनेर (जि. नागपूर) : हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे दारुड्याने नशेत महिला डॉक्टरवर अ‍ॅसिड फेकल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह अन्य दोघी शालेय विद्यार्थिनी जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी आरोपीस पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ३०७, ३२६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिलिंद अशोक कन्हेरे (२२, रा. तेलंगखेडी, ता. सावनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तिन्ही जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले आहे. जखमी डॉक्टर ही नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका आहेत.
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक गुरुवारी नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) या प्रोजेक्टचे सर्वेक्षण करण्यासाठी सावनेर येथे आले होते. यात तीन महिला डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकाचा समावेश होता. त्यांची टीम कैकाडी महाराज मंदिराजवळ उभी असताना मिलिंद तिथे आला. तो दारू प्यायला होता. त्याने डॉक्टरांना ‘तेरा चेहरा खराब कर दूंगा’ असे म्हणत बाटलीतील अ‍ॅसिड त्यांच्या दिशेने फेकले. मात्र, डॉक्टरांनी लगेच पळ काढत जवळच्या झोपडीत आश्रय घेतला. काही वेळातच दुसरी टीम त्या मंदिराजवळ पोहोचली.
काही वेळाने तो परत तिथेच आला आणि ‘तेरा चेहरा खराब कर दूंगा’ म्हणत त्यांच्या दिशेने बाटलीतील अ‍ॅसिड फेकले. त्यात महिला डॉक्टरच्या हात व पाय, त्यांच्यासोबत असलेल्या महिला रुग्णाचा चेहरा तसेच बाजूला उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थिनीच्या गळ्यावर अ‍ॅसिड पडल्याने त्या भाजल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले आणि चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

कठोर कारवाई करण्याची मागणी
त्याने फेकलेले अ‍ॅसिड टॉयलेटसाठी वापरले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शने केली.

 

Web Title: Acid attack on a female doctor in the savner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.