जमिनीच्या वादातून अॅसिड हल्ला, २० जण जखमी तर ३ जणांना अटक
By पूनम अपराज | Published: November 23, 2020 09:36 PM2020-11-23T21:36:45+5:302020-11-23T21:37:30+5:30
Acid Attack : सोनू गुप्ता, रवि कुमार, अजय कुमार, रोशन शाह, मोहित कुमार, बुलेटराम, भारत राम, पुष्पा देवी, सविता देवी आणि बबिता देवी अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.
बिहारच्या सारण जिल्ह्यात रविवारी जमिनीच्या वादातून अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात २० जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे तर तिघांना पोलिसांनीअटक केली आहे. अनूप शाह, तुलसी शाह आणि मुन्ना शाह अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना दाऊदपूर पोलीस ठाण्यातर्गत येणाऱ्या जैतपूर तख्त गावात घडली.
संजय शाह आणि रामचंद्र शाह यांच्यात जमिनीवरुन वाद होता. त्यावरुन रामचंद्र शाहच्या कुटुंबाने संजय शाहच्या कुटुंबियांवर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यानंतर रामचंद्र शाहच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी संजय शाह यांच्यासोबत भांडण केले. दरम्यान रामचंद्र शाहच्या काही समर्थकांनी दुसऱ्या गटावर चार ते पाच अॅसिडच्या बाटल्या फेकल्या. यामध्ये २० जण जखमी झाले, अशी माहिती मिळत आहे. तपासादरम्यान हल्लेखोरांनी दागिने बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅसिडचा वापर केल्याचं उघडकीस आलं आहे.
सोनू गुप्ता, रवि कुमार, अजय कुमार, रोशन शाह, मोहित कुमार, बुलेटराम, भारत राम, पुष्पा देवी, सविता देवी आणि बबिता देवी अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. पीडितांना दाऊदपूर, एकमा आणि छपराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर तीन गंभीर जखमी झालेले व्यक्तींना पाटणाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.