नागपूर जिल्ह्यातील सावनेरात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 07:52 PM2020-02-13T19:52:56+5:302020-02-13T20:04:00+5:30
हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे महिला डॉक्टरवर अॅसिड फेकण्याची घटना गुरुवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे महिलाडॉक्टरवर अॅसिड फेकण्याची घटना गुरुवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिलाडॉक्टरसह अन्य दोघी जखमी झाल्या असून, जखमींमध्ये शालेय विद्यार्थिनीचा समावेश आहे. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आरोपीस पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाय, संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शने केली.
मिलिंद अशोक कन्हेरे (२२) रा. तेलंगखेडी, ता. सावनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तिन्ही जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले आहे. जखमी डॉक्टर ही नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका आहेत.
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक गुरुवारी नॅशनल एड्स कन्ट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या प्रोजेक्टकरिता सर्वेक्षण करण्यासाठी सावनेर येथे आले होते. यात तीन महिला डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकाचा समावेश होता. सावनेर शहरातील पहलेपार परिसरातील झोपडपट्टी भागात सर्वेक्षण करण्यासाठी त्यांनी दोन टीम करून सर्वेक्षण करायला सुरुवात केली.
पहिली टीम कैकाडी महाराज मंदिराजवळ उभी असताना आरोपी मिलिंद तिथे आला. तो दारू प्यायला होता. त्याने डॉक्टरांना ‘तेरा चेहरा खराब कर दूंगा’ असे म्हणत बाटलीतील अॅसिड त्यांच्या दिशेने फेकले. मात्र, डॉक्टरांनी लगेच पळ काढत जवळच्या झोपडीत आश्रय घेतला. काही वेळातच दुसरी टीम त्या मंदिराजवळ पोहोचली. काही वेळाने तो परत तिथेच आला आणि ‘तेरा चेहरा खराब कर दूंगा’ म्हणत त्यांच्या दिशेने बाटलीतील अॅसिड फेकले. त्यात महिला डॉक्टरच्या हात व पाय, त्यांच्यासोबत असलेल्या महिला रुग्णाच्या चेहरा तसेच बाजूला उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थिनीच्या गळ्यावर अॅसिड पडल्याने त्या भाजल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. एवढेच नव्हे तर, त्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने फेकलेले अॅसिड टॉयलेटसाठी वापरले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याला डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ३०७, ३२६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलीस ठाण्यात तणाव
या घटनमुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेटून धरली. शिवाय, गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी सावनेर गाठले. त्यांनी घटनाक्रम जाणून घेतला. शिवाय, शीघ्रगती कृती दलासह अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली होती. दरम्यान, अनुचित प्रकार घडला नाही.