सोलापूर, पुण्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत; एटीएसची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 10:02 PM2018-08-11T22:02:42+5:302018-08-11T22:05:43+5:30
राज्यभरात 10 हून अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत नालासोपारा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी शोध मोहिम तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी मोठी कारवाई करत तिघांना अटक केली. अटक केलेल्या वैभव राऊत (वय -40), शरद कळसकर (वय - 25)आणि सुधन्वा गोंधळेकरने (वय - 39) घातपाताचा कट रचल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. सुधन्वाच्या चौकशीनंतर आज एटीएसने सोलापूर आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणात शस्ञसाठा हस्तगत केला आहे.
स्फोटांप्रकरणी एटीएसने शुक्रवारी वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर यांना अटक केली. या अटकेनंतर पोलिसांनी अनेक संशयितांची धरपकड सुरू केली. आतापर्यंत पोलिसांनी 16 ते 18 जणांची याप्रकरणी चौकशी केली आहे. यातील आरोपी गोंधळेकरच्या चौकशीनंतर १० गावठी पिस्तुले, १ गावठी कट्टा, १ एअर गन, १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्टल बॉडी, ६ पिस्टल मॅगझिन, ३ अर्धवट तयार पिस्टल स्लाईड, १६ रिले स्विच, ६ वाहनांच्या नंबर प्लेट्स, १ ट्रिगर मॅगझिन, १ चॉपर आणि १ स्टील चाकू आदी साहित्य जप्त केले आहे.
याशिवाय अर्धवट तयार शस्त्रांचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हॅंड ग्लोज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तके, स्फोटांबाबत हॅंडबुक, एक्प्लोसीव्ह व मोबाईल प्रींटआऊट, रिले स्वीच सर्कीट ड्रॉईग पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क, मेमरी कार्ड आदी साहित्यही जप्त केले आहे. याप्रकरणी राज्यभरात 10 हून अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत नालासोपारा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी शोध मोहिम तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.