पिंपरीत लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या १७३ जणांवर रविवारी पोलिसांकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:59 PM2020-06-08T18:59:46+5:302020-06-08T19:00:02+5:30
लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता देण्यात आली असली तरी काही निर्बंध अद्यापही लागू...
पिंपरी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने ते लॉकडाऊन मागे घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यात शिथिलता देण्यात आली असली तरी काही निर्बंध अद्यापही लागू आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७३ जणांवर रविवारी (दि. ७) पोलिसांनी कारवाई केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. मात्र जीवनावश्यक तसेच इतर काही आस्थापनांना यातून सवलत देण्यात आली आहे. तर काही बाबतीत अद्यापही निर्बंध आहेत. असे असतानाचही प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे देखील उल्लंघन करण्यात येत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत रविवारी सर्वाधिक देहूरोड पोलीस ठाण्यांतर्गत ४० कारवाई करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल हिंजवडी ३५, वाकड ३५, सांगवी १७, चिखली १५, चिंचवड १३, पिंपरी ३, दिघी ३, एमआयडीसी भोसरी ३, चाकण २, भोसरी १, आळंदी १, तळेगाव एमआयडीसी १, तर म्हाळुंगे पोलीस चौकींतर्गत ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर निगडी व तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे तसेच रावेत व शिरगाव पोलीस चौकी अंतर्गत एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.