पुणे ग्रामीण पोलिसांची बेकायदा वाळु व्यवसायावर मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 07:34 PM2020-01-20T19:34:01+5:302020-01-20T19:39:00+5:30
वाळुने भरलेले ७ ट्रक केले जप्त
बारामती : पुणे ग्रामीण पोलीसांनी बेकायदा वाळु व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी(दि १९) रात्री पुणे- सोलापुर महामार्गासह विविध परिसरात बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने वाळुने भरलेले ७ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. एकुण पाऊण कोटीहुन अधिक रकमेचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती गोपनीय विभागाने दौंड तालुक्यातून दौंड-पाटस रोडवर ट्रकने बेकायदेशीर वाळूची तस्करी होत असल्याच्या तक्रारीवरून बारामती क्राइम ब्रँच प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस कर्मचारी यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव व पोलीस यांनी वाळू तस्करी होणाऱ्या ठिकाणी सापळा रचला. तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीत पाटस टोल नाका, पुणे सोलापूर महामार्ग, पाट्स दौड रोड या ठिकाणी वाळूने भरलेले सहा ट्रक ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच दौंड पोलीस स्टेशन हद्दीत वाळूने भरलेला १ ट्रक ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण ७६ लाख ३५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वरील ७ वाहनांपैकी चार वाहनांवरील चालकांना ताब्यात घेतले आहे. सचिन मोहन खरात (रा.खोरोची तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) प्रकाश गयबी कसबे( रा. ढोकी उस्मानाबाद), मारुती मुरलीधर रणसिंग( रा.चौफुला तालुका दौंड, जिल्हा पुणे) गणेश कुंडलिक ठोंबरे(रा. शिरापूर तालुका दौंड, जिल्हा पुणे) अशी त्यांची नावे आहे.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप पाटील, अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे आरसीपी पथकातील २० पोलिस जवान तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पोलीस जवान विजय मदने, संपत खबाले यांनी कारवाईत सहभागी झाले होते.