दहा कोटींच्या अवैध केमिकल साठ्यावर भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई; तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Published: July 27, 2023 06:07 PM2023-07-27T18:07:12+5:302023-07-27T18:07:12+5:30
याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार साबीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी : दहा कोटी रुपयांच्या अवैध केमिकलच्या साठ्यावर भिवंडी गुन्हे शाखेने बुधवारी कारवाई केली असून विविध केमिकलचे ६६५४ अवैध केमिकलचे ड्रम असलेली १९ गोदामे सील करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार साबीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयंत नागजी छेडा वय ६० वर्ष,घोडबंदर रोड ठाणे, सुरेश ओमप्रकाश लोहकरे वय ३४ वर्ष रा. टेमघर, भिवंडी व लीलाधर लिंबा पाटोळे वय ३२ वर्ष रा कामतघर भिवंडी असे केमिकलचे अवैध साठवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी आपसात संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राहनाळ येथील शंकर कंपाउंड मध्ये जय पार्श्वा स्टोरेज नावाने असलेल्या गोदामांच्या १९ गाळ्यांमध्ये विविध केमिकलचे ६६५४ लहान मोठे ड्रम अवैधरित्या साठवणूक करून ठेवले होते. याबाबतची माहिती भिवंडी गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेने गोदामांवर कारवाई करून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार करीत आहेत.