भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ किलो गांजासह एका इसमास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:26 PM2022-04-15T17:26:00+5:302022-04-15T17:27:02+5:30
ऑटो रिक्षातून १५ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या इसमाला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: ऑटो रिक्षातून १५ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या इसमाला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या इसमाकडून २ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त करून आरोपीस अटक केली आहे.
भिवंडी गुन्हे शाखा युनिट-२ च्या पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने रांजणोली गांव, कमानीचे रोडवर एका अॅटो रिक्षातुन प्रवासी म्हणुन एक इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करीता घेवुन जात असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी छापा मारला असता दुर्गा राजेंद्र साह वय ४७ वर्षे, रा. रांजणोली, मुळगांव बिहार यास ताब्यात घेत त्याच्याकडून दोन निळया रंगांच्या प्लास्टिक पिशामधुन एकुण वजन १५.३६ कि.ग्रॅम वजनाचा व २,३०,४०० रु किमतीचा मानवी शरीरावर परिणाम करणारा गांजा हा अमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकुण २,४१,५३० रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत सपोनि विजय मोरे, सपोनि प्रफुल्ल जाधव, पोउपनिरी रमेश शिंगे, सपोउनि रामसिंग चव्हाण, सपोउनि हनुमंत वाघमारे, सपोउनि रविंद्र पाटील, पोहवा मंगेश शिर्के, पोहवा राजेंद्र चौधरी, पोहवा रामचंद्र जाधव, पोना सचिन जाधव, पोना साबिर शेख, पोना रंगनाथ पाटील, पोकॉ प्रशांत निकुंभ अंमली पदार्थ विरोधी पथक, ठाणे यांनी केलेली आहे.