‘लेडी सिंघम’ची कारवाई; दरोड्याच्या तयारीतील चौघांना पकडले
By शेखर पानसरे | Published: March 10, 2023 03:39 PM2023-03-10T15:39:53+5:302023-03-10T15:40:35+5:30
सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) हा पळून गेला आहे.
शेखर पानसरे
संगमनेर : ( अहमदनगर) दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना पोलिसांनीसंगमनेर-पुणे रस्त्यावर पकडले. एक जण पळून गेला. संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांनी व संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकाने शुक्रवारी (दि. १०) पहाटे ही कारवाई केली. पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र लक्ष्मण मधे (वय २५, रा. अभंग वस्ती, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), अविनाश चंद्रकांत जाधव (वय २६), प्रवीण चंद्रकांत जाधव (वय २४) (दोघेही. रा. शिरोली, बोरी, डावखर मळा, ता. जुन्नर, जि. पुणे), रोहन रामदास गिऱ्हे (वय २०, हल्ली रा. खोडद, ता. जुन्नर, जि. पुणे, मुळ रा. अकोले, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) हा पळून गेला आहे.
शहर पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली चालक हेड कॉस्टेबल अजय आठरे, संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पोलिस पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव यांना पाठविले. हे सर्वजण तपासासाठी जात असताना त्यांना संगमनेर-पुणे रस्त्यावर संगमनेर खुर्द शिवारात विनाक्रमांकाचे चारचाकी वाहन उभे दिसले. वाहनात बसलेल्या पाच जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. ते पळून जात असताना त्यातील चौघांना पकडण्यात आले. मात्र, एक जण पळून गेला.