रुपी बँकेच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर आली टाच;त्यांच्याकडे १०० कोटीहून अधिक थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 01:32 PM2020-08-25T13:32:03+5:302020-08-25T13:36:02+5:30
आर्थिक अनियमिततेमुळे रुपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत.
विशाल शिर्के
पिंपरी : रुपी को-आॅपरेटिव्ह बँकेने १३८ थकबाकीदारांची मालमत्ता शोधून, त्यावर टाच आणण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडे शंभर कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असून, ९४.३८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कजार्चा बोजा चढविण्यात आला आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे रुपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. १ लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेले खातेदार सुमारे ४ लाख ७० हजार आणि एक लाखावरील ठेवीदार-खातेदारांची संख्या सुमारे २७ हजार इतकी आहे. एक लाखावरील ठेवी या साडेनऊशे कोटी रुपयांहून अधिक आहेत. तर, एक लाखापर्यंत असलेल्या ठेवी तीनशे कोटी रुपयांच्या आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये रुपी बँकेचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आरबीआयकडे प्रलंबित आहे. दरम्यान, बँक प्रशासनानेदेखील जुन्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. कोरोनामुळे (कोविड-१९) ही मोहीम काहीशी संथ झाली असली, तरी १३८ थकबाकीदारांची मालमत्ता शोधून त्यावर टाच आणण्यात आली. या थकबाकीदारांकडे बँकेची तब्बल १०४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी ९४ कोटी ३८ लाख रुपयांच्या मालमत्ता शोधून त्यावर टाच आणली आहे. त्यात सदनिका, बंगला, जमीन, दुकाने, कार्यालये अशा स्वरूपाच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता त्यांना परस्पर विकता येणार नाहीत.
कर्जबुडव्यांच्या जामिनदारांकडे मालमत्तेबाबत चौकशी केली जाते. महसूल विभाग, महानगरपालिका, प्राप्तिकर विभाग आणि पॅन नंबरच्या आधारे मालमत्तेचा शोध घेऊन त्यावर टाच आणली जाते.
अपत्याच्या नावे बेकायदेशीर मालमत्ता
कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार काहीवेळा १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या नावावर मालमत्ता दाखवितात. अशा प्रकरणामध्ये बँक फौजदारी दावा करून संबंधित व्यवहार बेकायदेशीर असल्याचे दाखवून देते. त्यानंतर संबंधित मालमत्तेवर बोजा चढविला जातो. अशीच कारवाई गृहिणीच्या नावे केलेल्या मालमत्तेच्या बाबतही केली जाते. मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया केली जाते.
- नितीन लोखंडे, महाव्यवस्थापक, रुपी बँक
जून २०२० अखेरची बँकेची स्थिती
राज्यातील शाखा ३५
एकूण ठेवी १२९०.०९ कोटी
ठेवीदार ४,९७,७८१
कर्जे २९८ कोटी
वसुली ०.४२ कोटी