नवी मुंबई, पनवेलमध्ये ४२२ जणांवर कारवाई; ‘थर्टी फर्स्ट’ची भटकंती पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:17 AM2021-01-02T00:17:36+5:302021-01-02T00:17:44+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या उत्साहाला आवर घालण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या.
नवी मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४२२ वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात लावलेल्या बंदोबस्तात या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात २७ जणांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या उत्साहाला आवर घालण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटोकोर पालन करून घरातच आनंद साजरा करण्याच्या सूचना नवी मुंबईपोलिसांनी केल्या होत्या. त्यानंतरही अनेक जण मद्यपान करून वाहन चालवत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी शहर पोलीस व वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाते. त्यानुसार, गुरुवारी संध्याकाळपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आली होती. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची झडती, तसेच चालकाने मद्यपान केले आहे का, याची चाचणी त्या ठिकाणी घेतली जात होती. यावेळी एकूण ४२२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात २७ चालक मद्यपान करून वाहन चालवताना आढळून आले, तर २७० दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट भटकंती करताना पोलिसांच्या हाती लागले.
दरवर्षी थर्टी फर्स्टला पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो, याची जाणीव असतानाही वाहतुकीच्या नियमांना बगल देत, हे दुचाकीस्वार भटकरत होते. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बहुतांश तळीरामांनी घरातच पार्टीचा बेत आखल्याने ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईत घट झाली आहे. २०१९ मध्ये ड्रंक अँड ड्राइव्हच्या १७६ कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा अवघे २७ तळीराम वाहनचालक पोलिसांच्या हाती लागले आहेत, तर मागील तीन वर्षांत केवळ थर्टी फर्स्टच्या नाकाबंदीतच १ हजार १९९ वाहनांवर वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रतिवर्षी नाकाबंदीत तळीराम सापडत आहेत.