आहेर हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अभिजित पवारांवर तडीपारीची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: May 15, 2023 10:09 PM2023-05-15T22:09:30+5:302023-05-15T22:09:43+5:30

पोलिस उपायुक्तांची कारवाई, दोन वर्षांसाठी मुंबई ठाण्यासह पाच जिल्ह्यातून हद्दपार

Action taken against NCP's Abhijit Pawar in the Aher attack case | आहेर हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अभिजित पवारांवर तडीपारीची कारवाई

आहेर हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या अभिजित पवारांवर तडीपारीची कारवाई

googlenewsNext

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक अभिजित पवार यांना दाेन वर्षांसाठी मुंबई ठाण्यासह पाच जिल्ह्यातून तडीपार केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी साेमवारी दिली. त्यांच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.

आहेर यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अभिजित यांच्यासह हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चाैघांवर ठाण्यासह मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड आणि पालघर या पाच जिल्ह्यांतून हद्दपारीची नोटीस अलीकडेच नाैपाडा विभागाच्या सहायक आयुक्तांनी बजावली होती. या चौघांपैकी अभिजित याच्यावर १२ मे २०२३ राेजी तडीपारीची कारवाई पाेलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी केली. त्यांना सातारा येथील वठार या गावी नौपाडा पोलिसांच्या पथकाने १५ मे राेजी सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी तडीपारीची नाेटीस बजावली तेव्हाच या कारवाईबद्दल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी तीव्र संताप व्यक्त केला हाेता.

आहेर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुली व जावयाच्या हत्येची सुपारी दिल्याबाबत एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या हेमंत वाणी यांच्यासह चौघांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आहेर यांना मारहाण केली होती. नौपाडा पोलिस ठाण्यात आ. आव्हाड यांच्यासह सातजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. नौपाडा पोलिसांनी अभिजित याच्यासह चौघांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने चौघांची जामिनावर सुटका केली. वर्तकनगर, श्रीनगर, कळवा आणि नाैपाडा आदी पाेलिस ठाण्यांमध्ये अभिजित यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Action taken against NCP's Abhijit Pawar in the Aher attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे