दारूच्या गुन्ह्यात ४१ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 05:35 PM2024-04-03T17:35:36+5:302024-04-03T17:35:55+5:30
वर्षभरात विविध गुन्ह्यातील ५५ हजार ७७० गुन्हे उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकमतला दिली.
श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हातभट्टी दारूचे धंदे, बनावट मद्य निर्मिती,अवैध वाहतूक त्याच्या विक्रीचे छुपे रॅकेट चालवून दहशत निर्माण करणारे तसेच कारवाई दरम्यान उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या ४१ जणांवर महाराष्ट्र झोपड्पट्टीदादा, हातभट्टीवाले, अंमलीपदार्थ विरोधी कायदा ( एमपीडीए )अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच परराज्यातील ११६६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. असे वर्षभरात विविध गुन्ह्यातील ५५ हजार ७७० गुन्हे उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकमतला दिली. उत्पादन शुल्क विभागाची एमपीडीए अंतर्गत यंदाची सर्वांत मोठी कारवाई आहे.
राज्यातील मद्य निर्मिती व्यवसायात अवैद्य मार्गाने पैसा कमविण्यासाठी छुपे धंदे करणाऱ्या गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरात विशेष कारवाया हाती घेतल्या आहेत. त्यानुसार कलम ९३ प्रकरणाच्या कारवाईत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत ६७७२ बॉन्ड विविध आरोपींकडून घेण्यात आले आहेत. त्यात ५ हजारापासून ते १ लाखापर्यंत बॉन्ड घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील ६६३६ हॉटेल ढाब्यांवर दारू संबंधीच्या विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. त्यात ९ हजार १३३ आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आली आहे.
---------------------
- हातभट्टीचे २९,६०४ गुन्हे ( बॉक्स )
हातभट्टी दारूचे धंदे सुरू असल्याची खबर उत्पादन शुल्काला मिळाली त्या गावात धाडी घालून हातभट्टीचे धंदे उध्वस्त केले आहेत. राज्यात अशा हातभट्टीचे २९ हजार ६०४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात २० हजार ६८६ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. हातभट्टीची १० लाख ६१ हजार लीटर दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. या कारवाईचा परिणाम म्हणून देशीमद्य विक्रीत वाढ होऊन देशीदारू विक्रीत ९९ कोटींचा महसूल शासनाला मिळाला आहे.
------------------------
- परराज्यातील ११६६ आरोपींना अटक
पराज्यातील महागड्या स्वस्त मद्याची छुप्या मार्गाने राज्यात वाहतूक करणाऱ्या विविध गुन्ह्यात १ हजार १६६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
---------------------