फ्लॅटचा दरवाजा तोडून कारवाई, ईडीच्या हाती लागले 28 कोटीचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:10 PM2022-07-29T14:10:26+5:302022-07-29T14:11:16+5:30
अर्पिता मुखर्जींच्या फ्लॅटमधून २७.९ कोटींची रोकड, दागिने जप्त
कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्पिता मुखर्जी हिच्याशी संबंधित एका अपार्टमेंटमधून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि २७.९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. चटर्जीला शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांची निकटवर्तीय मानले जाते.
चटर्जी हिच्याशी संबंधित बेलघरिया येथील अपार्टमेंटमधून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. रात्रभर मोजदाद केल्यानंतर ही रक्कम २७.९० कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सांगितले. ईडीचे पथक आता दागिन्यांचे मूल्य काढत आहे. दागिने किलोंत असल्याचे समजते. ईडीने पाच दिवसांपूर्वी मुखर्जीच्या टाॅलीगंज भागातील अन्य एका सदनिकेतून दागिने आणि विदेशी चलनाशिवाय २१ कोटी रुपयांहून अधिकची रोकड जप्त केली होती.
फ्लॅटची चावी न मिळाल्याने दरवाजा तोडला
ईडी अधिकाऱ्यांनी बुधवारी दक्षिण कोलकाता आणि राजदांगा तसेच उत्तर कोलकातातील बेलघरिया येथे धाडी टाकल्या होत्या.
चौकशीदरम्यान मुखर्जीने या संपत्तीची माहिती दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेलघरियाच्या रथतला भागातील सदनिकांची चावी न मिळाल्याने तपास अधिकाऱ्यांना आत जाण्यासाठी दरवाजा तोडावा लागला.
झडतीदरम्यान या सदनिकांतून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बॅनर्जी सरकारमधील दिग्गज मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांना शनिवारी अटक करण्यात आली होती.
अर्पिता मुखर्जीच्या टॉलीगंज येथील सदनिकेत रोकड आढळल्यानंतर ईडीने चटर्जी यांना जेरबंद केले होते.