हनी ट्रॅपच्या जाळ्यात अभिनेता अन् दोन व्यापारीही अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 03:46 PM2021-09-05T15:46:34+5:302021-09-05T15:53:17+5:30
Honey Trap : चार वर्षांपासून हायप्रोफाईल अकाऊंट : समाज माध्यमांवर केली त्याने वेगळी ओळख
यवतमाळ : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शल्यचिकित्सकाला भावनिक आधार देत स्वत:च्या जाळ्यात ओढणाऱ्या युवकाने यापूर्वी अशाच पद्धतीने एक टीव्ही अभिनेता व दोन हायप्रोफाईल व्यापाऱ्यांनाही गंडविले. मात्र बदनामीच्या भीतीने कुणीच तक्रार केली नसल्याने हा प्रकार पुढे आला नाही. हायप्रोफाईल सोसायटीत फेक अकाऊंटच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख कायम ठेवण्यासाठी चार वर्षापासून त्याने बनावट अकाऊंट व्यवस्थित चालविले.
संदेश अनिल मानकर असे फसवणूक करणाऱ्या युवकाचे नाव आहे. संदेश हा अनेक वर्षांपासून कुटुंबातून दुरावलेला होता. त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला तर तो आईपासून दूर होत गेला. संदेश हा बारावी उत्तीर्ण असून अतिशय थंड डोक्याने त्याने समाज माध्यमांचा वापर सुरू केला. त्याने बनावट अकाऊंट तयार करून सलग चार वर्ष सांभाळले. या काळात अनेकांचा विश्वास संपादन केला. मोठमोठ्या व्यक्तींच्या तो समाज माध्यमांवर संपर्कात होता. त्याची फ्रेंडलिस्ट बघून कुणालाही ते अकाऊंट फेक असल्याचा संशय येणार नाही अशा पद्धतीने त्याने व्यूहरचना आखली होती.
दिल्लीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शल्यचिकित्सकाशी अशाच पद्धतीने संदेशने सोशल मीडियातील अकाऊंटच्या माध्यमातून मैत्री केली. तो एका महिलेच्या नावाने डाॅक्टरशी बातचित करत होता. या चर्चेतून त्याने डाॅक्टरच्या भाविनक समस्यांना हात घातला. यातून तो अधिकच जवळ पोहोचला. डाॅक्टरने दहा लाखांची लिमिट असेले क्रेडीट कार्डही संदेशला वापरायला दिले. मात्र संदेशने त्यातील एक रुपयासुद्धा खर्च केला नाही. वर्षभरापासून तो सतत चॅटींगद्वारे संपर्कात होता. डाॅक्टरही अडीअडचणी त्याच्याशी बिनधास्त शेअर करत होते. बऱ्याचदा अडीअडचणीच्या काळात भावनिक आधार देत संदेशने महिला बनून डाॅक्टरला सल्लेही दिले. एक चांगली शुभचिंतक मैत्रिण आपल्याला मिळाली अशा भावविश्वात संबंधित डाॅक्टर होते. पूर्णत: विश्वास संवादन झाल्याचे लक्षात आल्यानंतरच संदेशने आपल्या अडचणी सांगून डाॅक्टरला पैशाची मागणी केली. डाॅक्टरनेही जीवाभावाची मैत्रिण म्हणून दोन कोटी रुपयांची रोख थेट यवतमाळात आणून दिली. यातून संदेशने सोने खरेदी केले. थोडीफार रक्कम खर्च केली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने या हनी ट्रॅपचे बिंग फुटले.
पोलीस अधीक्षकांची संवेदनशिलता
दोन कोटी रुपयाने फसवणूक झाल्याची तक्रार घेवून डाॅक्टर यवतमाळात आले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेतली. कोण कुठला डाॅक्टर त्याच्याकडे दोन कोटीसारखी मोठी रक्कम दिल्याचा ठोस असा पुरावाही नव्हता. मात्र त्या डाॅक्टरची व्यवस्था पाहून एसपींनी प्रकरण तपासाला घेतले. सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू झाला आणि आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात उघड न झालेला गुन्हा संपूर्ण रकमेसह बाहेर आला. आरोपीलाही अटक करता आली. बदल्या व इतर प्रशासकीय जबाबदारीच्या गराड्यात प्राप्त तक्रारीचीही दखल एसपींनी घेतल्यानेच हा हनी ट्रॅप उघड झाला.