अभिनेते धर्मेश व्यास यांना लाखोंचा गंडा; पण गोल्डन अवरमध्ये तक्रार, पैसे परत मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:23 AM2022-12-13T08:23:23+5:302022-12-13T08:23:47+5:30
अंधेरीच्या न्यू म्हाडा लोखंडवाला परिसरात व्यास राहतात. त्यांना ७ डिसेंबर रोजी त्यांना अज्ञात नंबरवरून कॉल आला होता, ९ डिसेंबरला पैसे कापले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पासपोर्ट डिस्पॅच आला आहे. मात्र, तो ब्लॉक असून, अनब्लॉक करण्यासाठी पाच रुपये पाठवावे लागतील, असे सांगत अभिनेते धर्मेश व्यास यांना १ लाखाचा गंडा घालण्यात आला. मात्र, त्यांनी या प्रकरणी वेळीच ओशिवरा पोलिसात धाव घेतल्याने त्यांचे पैसे त्यांना परत मिळणार आहेत.
अंधेरीच्या न्यू म्हाडा लोखंडवाला परिसरात व्यास राहतात. त्यांना ७ डिसेंबर रोजी त्यांना अज्ञात नंबरवरून कॉल आला. या कॉलरने तुमचा पासपोर्ट आला असून, डिस्पॅच करण्याचा कोड ब्लॉक झाला आहे, तो अनब्लॉक करण्यासाठी पाच रुपये पाठवावे लागतील, असे त्यांना सांगितले. धर्मेश व्यास शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता समोरील नंबरवर पाच रुपये पाठविले. त्यानंतर, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एकूण ९९ हजार ९९९ रुपये वजा झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. तेव्हा त्यांनी तत्काळ त्यांच्या बँकेची संपर्क केल्यावर त्यांच्याबरोबर ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा तक्रार यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर धनावडे व निरीक्षक सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, हवालदार अशोक कोंडे, कॉन्स्टेबल विक्रम सरनोबत यांनी तत्काळ प्राप्त माहितीच्या आधार फिर्यादी यांच्या एचडीएफसी बँकेच्या मॅनेजरशी संपर्क करून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्त केली. तेव्हा व्यास यांचे पैसे आयडीएफसीमध्ये वळते झाल्याने त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून तत्काळ फिर्यादी यांची फसवणूक झालेली सर्व रक्कम गोठविण्यात यश प्राप्त झाले.