अभिनेता करण ओबेरॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:47 AM2019-05-10T06:47:25+5:302019-05-10T06:47:35+5:30
ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी टेलिव्हिजन कलाकार तसेच अँकर करणसिंह भूपेंद्रसिंह ओबेरॉय (४७) याला सोमवारी अटक करण्यात आली होती.
मुंबई : ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी टेलिव्हिजन कलाकार तसेच अँकर करणसिंह भूपेंद्रसिंह ओबेरॉय (४७) याला सोमवारी अटक करण्यात आली होती. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले.
३८ वर्षीय महिलेवर बलात्कार करत त्याचा व्हिडीओ ओबेरॉयने बनवला. त्याचा वापर करत तो तिला पैसे आणि शारीरिक सुखाची मागणी करत ब्लॅकमेल करत होता. अखेर त्याच्या छळाला कंटाळून तक्रार दाखल करत आहोत, असे तक्रारीत नमूद करत या प्रकरणी तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर ओबेरॉयवर गुन्हा दाखल करत ६ मे रोजी पोलिसांनी त्याला अटक केली.
त्याला स्थानिक न्यायलालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
कोठडीचे मुदत संपल्यानंतर ओबेरॉयला गुरुवारी पुन्हा स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी या प्रकरणाची अधिक तपासणी करण्याकरिता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणी ओबेरॉय हा शुक्रवारी सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचे त्याचे वकील दिनेश तिवारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
ओबेरॉयने जस्सी जैसी कोई नहीं, स्वाभिमान, छाया, निर्देश, जीवन बदल सकता है, हादसा, इनसाइड एज, रॉसवेल, न्यू मेक्सिको अशा विविध मालिकांमधून काम केले आहे. याशिवाय टायटन अंताक्षरी आणि
द ग्रेट इंडियन कॉमेडी शो या रिअॅलिटी शोसाठी त्याने अँकरिंगदेखील केले आहे.