खंडणीप्रकरणात अभिनेत्रीला लातूरहून अटक, एटीएसचा उपनिरीक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:55 PM2019-04-27T23:55:18+5:302019-04-27T23:55:42+5:30
रोल नंबर १८ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करुन गुन्हा मागे घ्यायचा असेल तर १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पुणे दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णु टेकाळे याला निलंबित करण्यात आले असून तो सध्या फरार आहे.
पुणे : रोल नंबर १८ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करुन गुन्हा मागे घ्यायचा असेल तर १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अभिनेत्री रोहिणी माने हिला लातूरहून अटक केली़ याप्रकरणातील पुणे दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) पोलीस उपनिरीक्षक अमोल विष्णु टेकाळे याला निलंबित करण्यात आले असून तो सध्या फरार आहे.
याप्रकरणात सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे याला पोलिसांनी या अगोदर अटक केली आहे़ रोहिणी मच्छिंद्र माने (रा़ नळदुर्ग, ता़ तुळजापूर, जि़ उस्मानाबाद), अभिनेत्री सारा श्रावण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (रा़ मुंबई, सध्या दुबई) आणि अमोल टेकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी राम जगदाळे याच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता़
याप्रकरणी सुभाष दत्तात्रय यादव (रा़ गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड) यांनी फिर्याद दिली होती़ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार हे याप्रकरणाचा तपास करीत असून अमित टेकाळे हा लातूरला असल्याची माहिती मिळाल्यावर ते लातूरला गेले होते़पण तेथून तो फरार झाला़ रोहिणी माने पोलिसांच्या हाताला लागली़ तिला पोलिसांनी अटक केली आहे़
याबाबतची माहिती अशी, रोल नंबर १८ मध्ये सुभाष यादव व रोहिणी माने यांनी अभिनेता व अभिनेत्री म्हणून काम केले होते़ चित्रपटाच्या प्रिमियरच्या पार्टीतील यादव हे डान्स करीत असतानाचा व्हिडिओ काढला होता़ तो तिने नंतर सोशल मिडियावर टाकला व त्याखाली अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर यादव डान्स करताना असे टाकून त्यांची बदनामी केली होती़ त्यांनी त्याची तक्रार यादव यांनी वानवडी पोलिसांकडे केली होती़ पोलिसांनी अदखलपात्र अशी नोंद केली़ त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावले़ त्यावेळी रोहिणी माने, अमित टेकाळे हा तिथे होता़ पोलीस ठाण्यात आपला विनयभंग केल्याची रोहिणीची तक्रार घेऊन पोलिसांनी यादव यांना अटक केली होती़ त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांना राम जगदाळे यांच्या कार्यालयात बोलावून घेतले व रोहिणीचे पाय धरायला लावले़ त्याचा व्हिडीओ काढला़ व त्यांच्या भावाकडून १ लाख रुपये घेतले़ त्यानंतर त्यांनी १५ लाख रुपयांची खंडणी मागितली़ ती त्यांनी न दिल्याने दुबईतील सारा हिच्या मार्फत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला़ पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांनी याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविल्यानंतर या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन गुंड राम जगदाळे याला अटक करण्यात आली होती़