इगतपुरीतील ड्रग्ज रेव्ह पार्टीत रंगेहात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री हिना पांचालला २३ दिवसानंतर दिलासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 08:24 PM2021-07-19T20:24:11+5:302021-07-19T20:28:19+5:30
२६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते.
नाशिक : ड्रग्जच्या सर्रास सेवनामुळे बहुचर्चित ठरलेली इगतपुरीमधील हवाईयन थीमवरील हायप्रोफाइल रेव्ह पार्टी ग्रामीण पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून उधळली होती. याप्रकरणी एनडीपीएसच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या बॉलिवुड अभिनेत्री हिना पांचालसह अन्य संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (दि.१९) सोमवारी जामीन मंजुर केला तर बर्थडे बॉय संशयित पियुष सेठीया आणि ज्याच्याकडे कोकेन मिळून आले तो हर्ष शहा याचा जामीन मात्र न्यायालयाने फेटाळून लावला.
इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये अंमली पदार्थांच्या सर्रास सेवनासह मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी एकत्र येत दोन दिवसीय पार्टी रंगविल्याची कुणकुण ग्रामीण पोलिसांना लागली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांनी शनिवारी २६जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पथकासह बंगल्यांवर छापा मारुन पार्टी उधळली होती. यावेळी बंगल्यांमधून संशयित हिना पांचालसह, बॉलिवुडशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर असलेल्या १२ तरुणी, १० तरुण अशा एकुण २२ संशयितांना ताब्यात घेतले होते. दोन दिवसांत या गुन्ह्यात बंगला मालकासह कोकेनसारखे अंमली पदार्थ पुरविणारा संशयित सराईत गुन्हेगार नायजेरियन उमाही पीटर यालाही पोलिसांनी मुंबईतुन अटक केली होती. त्यामुळे गुन्ह्यातील संशयितांची संख्या २७वर पोहचली होती. या गुन्ह्यात पोलिसांना अद्यापही दोन संशयित हवे असून त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकारच्या वतीने युक्तीवाद केला.