अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत, ED कडून चौकशी, मनी लॉड्रिंगप्रकरणी जबाब नोंदविण्याचं काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 06:26 PM2021-08-30T18:26:02+5:302021-08-30T18:58:00+5:30
ED is questioning bollywood actress jacqueline fernandez in delhi : मनी लाँड्रिग प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात तिचा जबाब नोंदवला जात आहे.
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. सध्या तिची दिल्लीत ईडीच्या कार्यालयात झाडाझडती सुरु आहे. मनी लाँड्रिग प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात तिचा जबाब नोंदवला जात आहे. जॅकलिनची चौकशी होत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुकेश चंद्रशेखरनिगडित एका मनी लाँड्रिग प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात मनी लाँड्रिगची केस आहे.
कोण आहेत सुकेश चंद्रशेखर?
23 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने चेन्नई स्थित सुकेश चंद्रशेखर आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल यांच्या बंगल्यावर छापा टाकला, ज्यांनी तिहार जेलमधून सर्वात मोठी खंडणी (200 कोटी) वसूल केली होती. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने कोस्ट रोडवरील सुकेश यांच्या बंगल्यावर छापा टाकला, त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये सांगितली गेली आहे. छाप्यादरम्यान कारवाई करत, ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आणि सुमारे 15 आलिशान वाहने देखील जप्त करण्यात आली.
राज्यात ईडीकडून धाडसत्र; RTO अधिकारी बजरंग खरमाटेंच्या घरावर धाडhttps://t.co/aFfOeWCZHK
— Lokmat (@MiLOKMAT) August 30, 2021
200 कोटी खंडणी प्रकरण
अलीकडेच, सुकेशने तिहार कारागृहातून एका मोठ्या व्यावसायिकाच्या पत्नीकडून सुमारे 200 कोटी रुपये उकळले होते. ज्यामध्ये आरबीएल बँकेच्या अधिकाऱ्यांसह तिहार प्रशासनातील काही लोकांना अटक करण्यात आली. ईडीने सुकेशच्या जवळची सहकारी लीना पॉलचीही चौकशी केली. सुकेशला खंडणी प्रकरणात स्पेशल सेलने अटक केली होती, तो सध्या ईओडब्ल्यूच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे, सुकेश हा AIDMK प्रतीक प्रकरणात आरोपी आहे आणि बराच काळ तुरुंगात आहे.
याआधी, पोलीस सूत्रांनी सांगितले होते की, हाय प्रोफाईल चीटर सुकेश तुरुंगातून एका मोठ्या व्यावसायिकाच्या संपर्कात होता आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात प्रकरण मिटवण्याचा दावा करून फोन करून पैसे उकळत होता. कारागृहात मोबाईल सापडल्यानंतर जेल प्रशासनाशी संबंधित काही अधिकारी रडारवर आले होते. सुकेश तीच व्यक्ती आहे, ज्याने AIADMK चे उपप्रमुख टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेऊन निवडणूक चिन्ह मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रकरण उघडकीस आल्यावर गुन्हे शाखेने सुकेशला अटक केली आणि सुकेशच्या माहितीवरून टीटीव्ही दिनाकरनलाही अटक करण्यात आली.