अनैतिक संबंधातून अभिनेत्री जया पाटील यांची हत्या, चंदगडच्या एका युवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 07:08 PM2021-01-21T19:08:28+5:302021-01-21T19:09:49+5:30
Murder : चंदगडच्या युवकाला अटक; चार दिवसांत गुन्ह्याच्या छडा
सातारा - ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील (वय ५६, रा. गजानन हौसींग सोसायटी, कृष्णानगर, सातारा) यांचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, हा खूनकोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड (मावेली) येथील आनंत दाजीबा पेडणेकर (वय ३३) या युवकाने केला असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी पेडणेकर याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विविध मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करणाºया ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील यांची शनिवार, दि. १६ रोजी मध्यरात्री राहत्या बंगल्यामध्ये अज्ञाताने गळा चिरून हत्या केली होती. या घटनेमुळे सिनेक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. शहर पोलीस ठाण्यातील दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या खूनप्रकरणाचा तपास करत होते. गत चार दिवसांपासून पोलिसांनी तहान, भूक, हरवून तपासाला सुरूवात केली. अभिनेत्री जया पाटील यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करणाºया व्यक्तींचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. यातूनच काही महत्त्वाची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आनंत पेडणेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने जुजबी माहिती देऊन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पोलीसीखाक्या दाखविताच त्याने क्षणाचाही विलंब न करता खुनाची कबुली दिली. अभिनेत्री जया पाटील या अनैतिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होत्या. त्यामुळेच त्यांचा खून केल्याचे पेडणेकरने पोलिसांना सांगितले. पेडणेकरची आणि अभिनेत्री जया पाटील यांची काही महिन्यांपूर्वीच साताऱ्यात ओळख झाली होती. या ओळखीतूनच जया पाटील या त्याला फोन करून घरी बोलवत होत्या. घटनेदिवशीही पेडणेकर घरी आला. नेहमीसारखीच जया पाटील यांनी जबरदस्ती केल्याने पेडणेकरने त्यांचा चाकूने गळा चिरल्याचे तपासात समोर आले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आॅचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सी.एम. मछले, पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, संदीप आवळे, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग यांनी या कारवाईत भाग घेतला.
पोलीस अधीक्षकांची शाबासकीची थाप
अभिनेत्री जया पाटील यांचे फोनवर अनेकांचे संभाषण होत होते. त्यामुळे खुनाचा छडा लावणे पोलिसांसमोर आव्हान होते. जया पाटील यांना ज्यांचे वारंवार फोन आले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला. अत्यंत कौशाल्याने केवळ चार दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा शहरच्या गुन्हे प्रकटीकरणच्या टीमचे कौतुक केले.