मुलीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या अभिनेत्रीच्या पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:26 AM2019-08-11T05:26:24+5:302019-08-11T05:27:04+5:30
ठाणे येथील अभिनेत्री प्रज्ञा पारकर (४०) हिने मुलगी श्रुती (१७) हिची हत्या करून स्वत: शुक्रवारी कळव्यात आत्महत्या केली.
ठाणे : येथील अभिनेत्री प्रज्ञा पारकर (४०) हिने मुलगी श्रुती (१७) हिची हत्या करून स्वत: शुक्रवारी कळव्यात आत्महत्या केली. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. श्रुतीच्या हत्येप्रकरणी मयत प्रज्ञाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, दुसरा गुन्हा प्रज्ञाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती प्रशांतविरोधात दाखल झाला आहे. त्याला शुक्रवारी मध्यरात्री अटक केली असून १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच हे दोन्ही गुन्हे पोलीस उपनिरीक्षक विजय खिलारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारतर्फे दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
प्रज्ञा यांनी लिहिलेल्या १३ ते १५ पानी चिठ्ठीत प्रशांत सोडून माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. तसेच चिठ्ठीच्या पान १ वर प्रज्ञा यांनी आत्महत्या करत असून श्रुतीसकट संसाराचे ओझे आता सांभाळणे नाही जमत, प्रशांत आणि नेहाचे अनैतिक संबंध जेव्हा समजले, तेव्हा २०१३ ला श्रुती फक्त सहा वर्षांची होती, असे नमूद केले आहे. तसेच पान नंबर १३ वर प्रशांतवर अवलंबून राहणे मंजूर नाही. सततचा अपमान, भांडणाला मी कंटाळले आहे. तसेच प्रशांतला नवरा म्हणत नाही. नवरेपणाचे सगळे अधिकार त्याने गमावले, असा मजकूर लिहिला आहे. तिला दिलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याने प्रशांतविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कळवा पोलीस पुढील तपास करत आहेत.