अदानी कार्यालयातून फोन अन् अधिकाऱ्याला झटका; दोन बँक खात्यांतून पैसे गायब
By गौरी टेंबकर | Published: February 8, 2023 01:26 PM2023-02-08T13:26:51+5:302023-02-08T13:27:18+5:30
तक्रारदार गुर्ले रमणा (वय ४५) एअर इंडियात टेक्निकल ऑफिसर आहेत. त्यांना ५ फेब्रुवारीला व्हॉट्सॲप मेसेज आला.
मुंबई : वीजबिल न भरल्याच्या बोगस मेसेजचा झटका नुकताच एअर इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याला बसला. त्यांना ५८ हजार ९४२ रुपये गमवावे लागले. त्यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार गुर्ले रमणा (वय ४५) एअर इंडियात टेक्निकल ऑफिसर आहेत. त्यांना ५ फेब्रुवारीला व्हॉट्सॲप मेसेज आला. त्यात ‘आपले गेल्या महिन्यातील बिल अद्ययावत झाले नसून, त्यामुळे आज रात्री आपल्या घराची वीज तोडणी केली जाईल’, असे नमूद केले होते. रमणा यांनी संबंधित क्रमांकावर फोन केला. संबंधिताने त्यांना सांगितले की, तो अदानी वीज कंपनीतून बोलत असून, वीज बिल न भरल्याने त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यावर बिल भरल्याचे रमणा यांनी सांगितले. तेव्हा ते अपडेट झालेले नसल्याचे सांगत त्यांना अदानी वीज कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाण्यास सांगितले. त्यानुसार रमणा यांनी फॉलो करत क्रेडिट कार्डने १० रुपये भरले. मात्र, ते अद्याप आम्हाला मिळालेले नसून, भामट्याने रमणा यांना त्यांच्या मोबाइलवर ॲनी डेस्क ॲप व अन्य ॲप डाऊनलोड करायला लावत पैसे न मिळाल्याचे सांगितले.
...असे सापळ्यात अडकविले
- रमणा यांना फोन पे वर जात ॲड न्यू अकाऊंट करायला लावले. एचडीएफसी बँकेचा आयएफएससी कोड देत त्यांच्या नावाने पेटीएमच्या प्रोसिड टू पे वर क्लिक करून ४७५७९ आणि रमणा यांच्या मोबाइल क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाकायला लावले.
- त्यानुसार त्यांच्या एसबीआय खात्यातून ४७ हजार ५७९ आणि एचडीएफसी बँक खात्यातून ९ हजार ८६९ रुपये काढण्यात आले.
- रमणा यांना १ हजार ४९४ रुपये Myntra Private Limited,UPI ID Myntra.payu@ICICI यावर हस्तांतरण झाल्याचा मेसेज आला आणि वीज बिल आता अद्ययावत झाल्याचे सांगत संबंधिताने फोन ठेवला.