प्रशासकीय नियम धाब्यावर; लोणावळ्यात 'विकेंड'ला पर्यटनासाठी आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 09:04 PM2020-07-12T21:04:31+5:302020-07-12T21:05:51+5:30
प्रशासनाकडून वारंवार बाहेर न पडण्याचे आवाहन करून देखील शनिवारी व रविवारी लोणावळ्यात पर्यटनाला आले होते.
लोणावळा : पर्यटनस्थळे बंद असताना देखील लोणावळ्यात फिरायला आलेल्या तब्बल 69 पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवार व रविवारी विशेष कारवाई मोहिम राबवत गुन्हे दाखल करण्यात आलेे आहे. मास्क न लावता फिरणार्या 44 जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.
कोरोना या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता शासन स्तरावरून वारंवार सुचना दिल्या जात असताना काही नागरिक या सूचनांकडे कानाडोळा करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या सोबत मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. लोणावळा व खंडाळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे बंद असताना काही पर्यटक शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात येत आहेत. मागील तिन आठवडे सातत्याने विशेष मोहिम राबवत नाकाबंदी करत पोलीस प्रशासन कारवाई मोहिम राबवत आहे. शेकडो जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी देखिल पर्यटकांचा उन्माद पहायला मिळत आहेत.
लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत व लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, पोलीस हवालदार अमोल कसबेकर, जयराज पाटणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी विशेष कारवाई मोहिम राबवत पर्यटनस्थळांकडे जाणार्या पर्यटक वाहनांवर कारवाई करत त्यांना माघारी पाठवले.
पोलीस प्रशासन असो व नगरपरिषद प्रशासन हे नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना ही महामारी असून तीला रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी फिजिकल अंतर राखणे तसेच चेहर्यावर मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. पर्यटनस्थळे यावर्षी बंद असल्याने मुंबई पुण्यासह इतर भागातील पर्यटकांनी लोणावळ्यात येऊ नये, जे नागरिक लोणावळ्यात बंगले व फार्महाऊसमध्ये लाॅकडाऊन पुर्वी किंवा लाॅकडाऊन दरम्यान आले आहेत, त्यांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, स्थानिक नागरिकांनी बाजार भागात गर्दी करू नये, दुकानदारांनी देखील स्वतः मास्क लावावे तसेच मास्क न लावणार्या व्यक्तींना माल देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे.