ॲड. चव्हाणचे कारनामे ‘सीबीआय’ खोदणार! खंडणी प्रकरणासह दोन गुन्ह्यांचा तपास वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 06:25 AM2023-05-24T06:25:01+5:302023-05-24T06:25:28+5:30
बीएचआर पतसंस्थेतील गैरप्रकार व फसवणूकप्रकरणी डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मोक्काअंतर्गत तपासकामी झंवर यांच्या पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी पोलिस अधिकाऱ्यांकरवी सूरज सुनील झंवर (जळगाव) यांच्याकडून १ कोटी २० लाखांची खंडणी वसूल केल्या प्रकरणासह अन्य एका गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवीण चव्हाण यांच्यासह पुण्यातील तपास अधिकारी सूचिता खोकले आता सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत.
बीएचआर पतसंस्थेतील गैरप्रकार व फसवणूकप्रकरणी डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मोक्काअंतर्गत तपासकामी झंवर यांच्या पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकण्यात आली होती. झंवर यांच्या लॅपटॉपमध्ये पुरावे, दस्तऐवजासह चाकू मिळाल्याचा दावा ॲड. चव्हाण व तपास अधिकारी खोकले यांनी पुणे न्यायालयात केला होता. त्यानंतर ॲड. चव्हाण यांनी झंवर यांना तपासकामी बोलावले होते आणि २२ जानेवारी २०२१ रोजी अटक करून १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली होती. या १४ दिवसांच्या कोठडीत झंवर यांचा एकही जबाब नोंदविला गेला नाही. २८ मे रोजी झंवर यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने झंवर यांचा कुठलाही सहभाग दिसून येत नसल्याचे मत नोंदविले होते.
जामीन दिल्यानंतरही झंवर यांना जबाबासाठी बोलावत खंडणीनाट्य रचले गेले आणि उदय पवार (रा. चाळीसगाव) यांच्यामार्फत १ कोटी २० लाख रुपयांची खंडणी स्वीकारल्याची फिर्याद सूरज झंवर यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार जळगाव पोलिसांनी प्रवीण चव्हाण, मध्यस्थी उदय पवार, शेखर सोनाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ॲड. चव्हाण व सोनाळकर यांनी जळगाव न्यायालयाकडून जामीन मिळविला होता. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार चव्हाण हजेरीसाठी पोलिसांसमोर आले होते. त्याचवेळी अन्य एका गुन्ह्यात चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर कारागृहात असणाऱ्या चव्हाणांची सुटका झाली होती. या प्रकरणातील गांभीर्य ध्यानात घेऊन राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार, दि. २२ मे रोजी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
त्याचाही शाेध घेणार
n जळगावच्या विजय भास्करराव पाटील यांनी निंभोरा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल होता.
n याप्रकरणात सुनील झंवर, नीलेश भाईटे यांच्यासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
n या गुन्ह्यातही ॲड. प्रवीण चव्हाण यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचाही तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
कुठलाही सहभाग आणि संदर्भ नसताना मला गोवण्यात आले. तपासात कुठलाही पुरावा सापडला नसताना पदाचा गैरवापर करून चव्हाण यांनी मानसिक व शारीरिक त्रास दिला. या प्रकरणात अनेकांच्या भूमिका संशयास्पद आहे. त्याचे गांभीर्य ओळखून हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
- सूरज झंवर, फिर्यादी