ॲड. प्रवीण चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात; एका गुन्ह्यात जामीन, दुसऱ्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:36 AM2023-02-27T06:36:12+5:302023-02-27T06:36:25+5:30
मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण चाळीसगाव येथे विशेष तपास पथकासमोर रविवारी हजर झाले. मात्र, अन्य एका गुन्ह्यात न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याचे स्पष्ट होताच जळगाव शहर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी ॲड. चव्हाण यांना ताब्यात घेतले.
नीलेश रणजीत भोईटे (रा. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या चौकशीत साक्षीदार व पुण्यातील व्यावसायिक तेजस मोरे यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती. त्यानंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांना सहआरोपी करण्यात आले होते. ॲड. चव्हाणला जळगाव न्यायालयाने खंडणीच्या अन्य एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर करताना या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष पथकासमोर हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ॲड. चव्हाण यांनी रविवारी सकाळी चाळीसगाव येथे हजेरी लावली. मात्र, ॲड. चव्हाण यांच्याविरोधात जळगाव शहर पोलिसातही अन्य एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याने हजेरीसाठी आलेल्या ॲड. चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले.