‘सुली डील्स’वर मुस्लीम महिलांची ऑनलाइन विक्री; बुलीबाईच्या आधीचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:16 PM2022-01-08T12:16:20+5:302022-01-08T12:25:28+5:30

छावणी पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या ॲड. आस्मा शफिक शेख यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement of online sale of Muslim women on 'Suli Deals' app | ‘सुली डील्स’वर मुस्लीम महिलांची ऑनलाइन विक्री; बुलीबाईच्या आधीचा प्रताप

‘सुली डील्स’वर मुस्लीम महिलांची ऑनलाइन विक्री; बुलीबाईच्या आधीचा प्रताप

googlenewsNext

औरंगाबाद : ‘बुलीबाई’ ॲपच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील महिलांची ऑनलाइन विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. याच प्रकारच्या ‘सुली डील्स’ ॲपद्वारेही सोशल मीडिया वापरणाऱ्या मुस्लीम महिलांचे त्यांच्या अकाउंटवरून छायाचित्र घेऊन ॲपद्वारे ऑनलाइन विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला.

छावणी पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या ॲड. आस्मा शफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुलै २०२१ मध्ये सुली डील्स ॲप म्हणून एक संकेतस्थळ बनविण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सोशल मीडिया वापरणाऱ्या मुस्लीम समाजातील महिलांचे छायाचित्र विनापरवानगी डाऊनलोड करून घेत संकेतस्थळावर ऑनलाइन विक्रीसाठी अपलोड केले आहेत. त्यात या महिला विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यांच्यावर बोली लावा, असे म्हटले आहे. ५ जुलै २०२१ रोजी व्टिटरवर ‘डू पाॅलिटिक्स इन’चे संपादक आणि सहसंस्थापक अजित भारती नावाच्या व्यक्तीने सुली डील्स ॲप मी वापरतो व तुम्हीसुद्धा वापरा असे म्हणून ॲपचे समर्थन करीत ॲपची लिंक शेअर केली. या प्रकारातून मुस्लीम समाजातील महिलांच्या मनास लज्जा वाटेल आणि प्रतिष्ठाहनन करण्याचे काम करण्यात आले. याविषयी तक्रारकर्त्यांनी १३ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय महिला आयोग आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून छावणी ठाण्यात अजित भारतीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास निरीक्षक शरद इंगळे करीत आहेत.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

केंद्र सरकार मुस्लीम महिलांसाठी ट्रिपल तलाक मुद्द्यावर सहानुभूती दाखवते. त्याचवेळी सुली डील्स, बुलीबाई ॲप तयार करणाऱ्यांविरोधात एक शब्द बोलत नाही. त्यांच्या विरोधात कारवाई करीत नाही. हा प्रकार दोन समाजांत तेढ निर्माण करणारा आहे. पाच राज्यांतील निवडणुकीमुळे अशा पद्धतीचा द्वेष पसरविण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार ॲड. शेख यांनी पत्रकार परिषदेत केला.

Web Title: Advertisement of online sale of Muslim women on 'Suli Deals' app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.