Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांहून अधिक रुपयांना घातला गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 12:45 PM2022-03-04T12:45:31+5:302022-03-04T12:46:19+5:30

Crime News : या महिलेने आरबीएल बॅंकेची प्रतिनिधी असल्याचे सांगून त्याला बॅंक खात्यात एक ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितले.

african nationals duped more than 8 lakh rupees by chandigarh facebook friend  | Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांहून अधिक रुपयांना घातला गंडा 

Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांहून अधिक रुपयांना घातला गंडा 

googlenewsNext

चंडीगड : चंडीगडमधील एका व्यक्तीला फेसबुकवर परदेशी महिलेसोबत मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. या महिलेचे फेसबुक अकाउंट बनावट होते. या बनावट अकाउंटद्वारे मोठी फसवणूक केली आहे. महिलेने या व्यक्तीला आठ लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी तक्रारीवरुन सायबर सेलने तीन आफ्रिकन  नागरिकांना अटक केली आहे. 

चंडीगड पोलिसांच्या सायबर सेलने टीना फ्रान्सिस या महिलेच्या नावाने असलेल्या बनावट फेसबुक प्रोफाईलद्वारे स्थानिक रहिवाशाची 8.72 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी घाना प्रजासत्ताक, आयव्हरी कोस्टसह पश्चिम आफ्रिकी देशांतील तिघांना अटक केली आहे. या आरोपींना दिल्लीतील पालम येथील राज नगरमधून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी माजरा येथील रहिवासी यशवीर सिंह याने तीन महिन्यांपूर्वी फेसबुकवर टीना फ्रान्सिस नावाच्या महिलेशी मैत्री केली होती. टीना फ्रान्सिसने त्याला यूकेतून एक महागडी भेटवस्तू पाठवत असल्याची बतावणी केली. मात्र त्याचा कस्टम चार्ज तू भरावा असे सांगितले. काही दिवसांनंतर यशवीर सिंह याला एका महिलेचा फोन आला. 

या महिलेने आरबीएल बॅंकेची प्रतिनिधी असल्याचे सांगून त्याला बॅंक खात्यात एक ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितले. यशवीरने अनेक खात्यांमध्ये पैसे जमा केले, पण त्याला कोणतीही भेटवस्तू मिळाली नाही. टीना फ्रान्सिस ही महिला या संपूर्ण घडामोडींदरम्यान माझ्या सतत संपर्कात होती, असे यशवीरने पोलिसांना सांगितले.

गिडॉन सेबॅस्टियन (वय 42), घानाचा क्लेमेंट अफुल (वय 33), आणि आयव्हरी रिपब्लिकमधील मोईस (वय 30) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायलयात हजर केले असता, त्यांना न्यायलयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या संशयित आरोपींकडून 23 मोबाईल फोन, 23 सिमकार्ड, विविध बॅंकांची 40 एटीएम कार्ड, 8 पासबुक, 4 चेकबुक, 5 वाय-फाय हॉटस्पॉट, 1 डोंगल आणि 4 लॅपटॉप जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका मीडिया रिपोर्टमध्ये सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा देशाच्या विविध भागात नोंद असलेल्या फसवणुकीच्या 50 हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या आणि जप्त केलेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक (IMEI Number) सर्व राज्यांच्या पोलिसांच्या एका सामाईक पोर्टलवर अपलोड केले जातील. यातून हे फोन इतर ऑनलाइन गुन्ह्यांसाठी वापरले गेले होते की नाही, हे पोलिसांना समजू शकेल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: african nationals duped more than 8 lakh rupees by chandigarh facebook friend 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.