‘गुन्हेगारासारखा वागला आफताब’, पोलिस अधिकारी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:07 AM2022-11-20T11:07:53+5:302022-11-20T11:09:04+5:30
श्रद्धा वालकर हिच्या हत्येबाबत माणिकपूर पोलिसांसह दिल्लीचे पोलिसही सध्या तपास करीत आहेत.
वसई : श्रद्धा वालकर (वय २७) या तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या होऊन तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याच्या घटनेने देशभर खळबळ माजलेली आहे. ज्या मुलीवर जिवापाड प्रेम केले, त्याच मुलीच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर आरोपी आफताब पूनावाला याने पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, माणिकपूर पोलिसांनी श्रद्धाच्या बाबतीत दोन वेळा चौकशीसाठी बोलावले असता तो सराईत गुन्हेगारासारखा वागल्याचे मत पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
श्रद्धा वालकर हिच्या हत्येबाबत माणिकपूर पोलिसांसह दिल्लीचे पोलिसही सध्या तपास करीत आहेत. वसईतील एका पोलिस अधिकाऱ्याने संगितले की, श्रद्धा प्रकरणात आरोपी आफताब याला दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या दोन्हीही वेळेस त्याने दिलेल्या जबानीत तफावत आढळली होती. यामुळे माणिकपूर पोलिसांचे पथक दिल्लीला गेले होते.
आफताब याने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना उतरे देताना आपण त्या गावचेच नाही हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तो सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागला होता. माणिकपूर पोलिसांनी दिल्लीत जाऊन दिल्ली पोलिसांच्या सहकार्याने त्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात मोलाची भूमिका बजावली होती, असेही हा अधिकारी म्हणाला. दरम्यान, आरोपी आफताब याने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केल्यानंतर अतिशय शांत डोक्याने त्याने नजीकच्या मेहरोली जंगलात फेकून दिले होते.