श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 02:46 PM2024-11-15T14:46:31+5:302024-11-15T14:49:13+5:30
श्रद्धा वालकरचे तुकडे करणारा आरोपी तिहार तुरुंगात कैद आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत 2022 साली झालेल्या श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. आता या हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला (Aftab poonawala) याच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. तिहार तुरुंगात कैद असलेला आफताब लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या हिटलिस्टवर आला आहे.
बाबा सिद्दिकींच्या हल्लेखोराचा कुलासा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील आरोपी शिवकुमार गौतम याने चौकशीत हा खुलासा केला आहे. सिद्दीकींच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या बिष्णोई टोळीचा सदस्य, शुभम लोणकर याने आफताब पूनावालाबाबत आपल्याशी चर्चा केल्याचे शिवकुमार गौतमने पोलिसांसमोर कबूल केले. मात्र, आफताब अत्यंत सुरक्षेत असल्याने टोळीने त्यांची योजना थांबवली.
ही माहिती समोर आल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासन आफताब पूनावालाच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. आफताबला तिहार तुरुंगातील क्रमांक 4 मध्ये ठेवण्यात आले आहे. तिहार तुरुंगाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र प्रशासनाने मीडियातील वृत्तांची दखल घेत आफताभच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.
18 मे 2022 रोजी श्रद्धाची हत्या
18 मे 2022 रोजी मुंबईची रहिवासी असलेल्या श्रद्धा विकास वालकरची दिल्लीत हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला आणि श्रद्धा अनेक दिवसांपासून दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. श्रद्धाचा मित्र अनेक दिवसांपासून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तिचा काहीच संपर्क होत नव्हता. अखेर त्याने ही बाबत श्रद्धाच्या वडिलांना सांगितले आणि त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या माहितीवरुन दिल्ली पोलिसांनी आफताबला घरातून अटक केली. चौकशीत त्याने श्रद्धाची हत्या करुन तिचे तुकडे केल्याचु कबुली दिली.