श्रद्धा हत्याकांड : आफताब शरीराचे तुकडे करून फेकून देईल; श्रद्धाने पोलिसांकडे व्यक्त केली होती भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 06:50 AM2022-11-24T06:50:30+5:302022-11-24T06:51:23+5:30
Shraddha Walker Murder Case : "आफताब मारहाण करीत असल्याची तसेच मला ठार मारणार असल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना आहे. आज त्याने मला गुदमरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो मला घाबरवतो आणि ब्लॅकमेल करतो. तो मला ठार करेल आणि जागोजागी कापून फेकून देईन."
नालासोपारा : श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवे खुलासे होत आहेत. श्रद्धाने स्वहस्ते लिहिलेली पोलिस तक्रारीची प्रत बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. नोव्हेंबर २०२० मध्ये तुळींज पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीमध्ये ‘आफताब आपणास सहा महिन्यांपासून मारहाण करीत असून, त्याने आपल्या शरीराचे तुकडे करून फेकून देईन,’ अशी धमकी दिली असल्याचे नमूद आहे.
या पत्रानुसार, आफताब मारहाण करीत असल्याची तसेच मला ठार मारणार असल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना आहे. आज त्याने मला गुदमरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो मला घाबरवतो आणि ब्लॅकमेल करतो. तो मला ठार करेल आणि जागोजागी कापून फेकून देईन, दोन वर्षांनी तिने व्यक्त केलेली ही भीती तंतोतंत खरी ठरली आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला आफताबने एव्हरशाईन - वसई येथे राहत असताना गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी अर्ज देण्यास सांगून मेडिकल करून येण्यास सांगितले होते. पण, तिने याकडे कानाडोळा केला.
तिच्या तक्रारीवर तुळींज पोलिसांनी चौकशी केलेली आहे. चौकशीदरम्यान आपली कोणतीही तक्रार नसून मी दिलेली तक्रार मागे घेत आहे. आपली तक्रार नसल्याचे स्टेटमेंट तिने पोलिस ठाण्यात दिले होते.
- सुहास बावचे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-३
पत्रावर कारवाई का झाली नाही याचा तपास होणार : फडणवीस
- श्रद्धा वालकर हिने २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
- श्रद्धाचे पत्र मी पाहिले. त्या पत्रावर कारवाई का झाली नाही, याचा तपास केला जाईल. या पत्रावर वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित आज श्रद्धाचे प्राण वाचू शकले असते, असेही ते म्हणाले.