२७ वर्षांनंतर मुलानं विचारलं माझे वडील कोण आहे? तेव्हा गॅंगरेप पीडितेने पोलिसात दाखल केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 12:26 PM2022-04-07T12:26:16+5:302022-04-07T12:26:30+5:30
Uttar Pradesh Gangrape News : मुलगा मोठा झाल्यावर त्याने आईला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं तेव्हा आईने कोर्टाच्या आदेशावरून केस दाखल केली. ज्यानंतर आरोपींची डीएनए टेस्ट केली गेली.
Uttar Pradesh Gangrape News : उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये १२ वर्षांची असताना गॅंगरेपची शिकार झालेल्या पीडितीने घटनेच्या २७ वर्षानंतर कोर्टाच्या आदेशावरून आरोपींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्यानंतर डीएनए टेस्टमध्ये दोन आरोपींपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. गॅंगरेपनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली होती आणि त्यानंतर तिने एका बाळाला जन्मही दिला होता. मुलगा मोठा झाल्यावर त्याने आईला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं तेव्हा आईने कोर्टाच्या आदेशावरून केस दाखल केली. ज्यानंतर आरोपींची डीएनए टेस्ट केली गेली.
साधारण २७ वर्षाआधी महिला आपली बहीण आणि भावोजीच्या घरी राहत होती. यादरम्यान त्याच भागात राहणारा नाकी हसन एक दिवस घरात शिरला होता आणि त्याने महिलेसोबत रेप केला. हसननंतर त्याचा लहान भाऊ गुड्डूने सुद्धा तिच्यावर रेप केला.
त्यावेळी पीडितेचं वय १२ वर्षे होतं. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, १३ वर्षांची असताना ती गर्भवती झाली होती आणि १९९४ मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला होता. हा मुलगा उधमपूर गावातील एका व्यक्तीला देण्यात आला होता. यादरम्यान पीडितेच्या भावोजींची बदली झाली. पीडिताही त्यांच्यासोबत गेली.
भावोजीने पीडितेचं लग्न गाजीपूरमधील एका तरूणासोबत लावून दिलं. पण १० वर्षांनंतर तिच्या पतीला तिच्यासोबत झालेल्या रेपची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने तिला तलाक दिला. मग महिला आपल्या गावात येऊन राहू लागली होती. आतापर्यंत तिचा मुलगाही मोठा झाला होता. त्याला त्याच्या आई-वडिलांबाबत जाणून घ्यायचं होतं. तेव्हा त्याला त्याच्या आईचं नाव समजलं. तो तिला भेटायला गेला आणि त्याने तिला वडिलांचं नाव विचारलं. यानंतर त्याच्या आईने कोर्टाच्या आदेशावरून दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींची डीएनए टेस्ट केली. त्यातील आरोपी गुड्डूची डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह आली.
संजय कुमार एसपी सीटी यांनी सांगितलं की, मुलगा मोठा झाल्यावर आईला भेटला आणि त्याला घटनेबाबत समजलं. महिलेच्या तक्रारीवरून दोन लोकांविरोधात गॅंगरेपचा गुन्हा दाखल करण्यात आला. ५ मार्च २०२१ तक्रार दाखल केल्यावर आऱोपींचा शोध घेणं सुरू होतं. पोलिसांनी दोन्ही आरोपींची डीएनए टेस्ट केली होती. आता डीएनए टेस्टचा पुरावा मिळाला आहे. पोलीस दोन्ही आरोपींना अटक करण्याची कारवाई करत आहे.