३० वर्षांनी ‘त्या’ लुटारूला गुजरातमधून बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 06:46 PM2019-04-12T18:46:24+5:302019-04-12T18:47:25+5:30
गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही कारवाई केली.
मुंबई - मुलुंडमधील सशस्त्र दरोड्यासह ठाणे, नवी मुंबईत चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या ‘त्या’ लुटारूला ३० वर्षांनी गुजरात येथून अटक झाली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने त्याला अटक केली. मुलुंडच्या नूतन ज्वेलर्सवर १९८७ मध्ये दिलीप पटेल (५५) याने साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा टाकला होता. त्यात ९६० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांवर हात साफ केला. यात एक जण जखमी झाला. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत, ५ जणांना अटक केली. मात्र जामिनावर बाहेर येताच पटेल हा फरार झाला. ३० वर्षे तो ओळख लपवून राहत होता. अखेर गुन्हे शाखेच्या कक्ष सातकडे गुन्हा वर्ग झाला. त्यानुसार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या पथकाने तपासाअंती गुजरातमधून त्याला गुरुवारी अटक केली.