लग्न मोडल्यावर बनावट अकाऊंट बनवून लिहिले मॅरिड, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 09:09 PM2022-08-03T21:09:06+5:302022-08-03T21:10:26+5:30
Cyber Crime : पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर हद्दीतील २४ वर्षीय तरुणीचा शहरातीलच एका तरुणाशी विवाह जुळला होता.
बीड : एका तरुणीशी जुळलेले लग्न मोडल्याने तरुणाने तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवून मॅरिड असे लिहून काही जुने फोटो शेअर केले. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत २ ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर हद्दीतील २४ वर्षीय तरुणीचा शहरातीलच एका तरुणाशी विवाह जुळला होता. या दरम्यान ते दोघे एकमेकांशी फोनवर बाेलत होते, शिवाय एकमेकांना फोटोदेखील शेअर केले होते. नंतर कौटुंबिक कारणावरून त्यांचा विवाह मोडला. तेव्हापासून तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. तरुणाने एका मुलीशी विवाह करून संसार थाटला. मात्र, तरुणी अद्याप अविवाहित आहे. तिच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून ती विवाहित असल्याचे प्रोफाइलमध्ये लिहिले होते. ही बाब मैत्रिणीकडून कळाल्यावर ९ जुलै रोजी तरुणीने सायबर सेलकडे धाव घेतली. तेथून ही कुरापत लग्न मोडलेल्या तरुणाने केल्याचे उघड झाले. २ ऑगस्ट रोजी तरुणीने शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून माहिती तंत्रज्ञान अधिनियम व चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पो.नि.केतन राठोड तपास करत आहेत.