लग्न करून कोर्टाबाहेर पडला अन् नवरदेवाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:40 PM2018-12-22T18:40:01+5:302018-12-22T18:41:57+5:30
अजय धोटे असं अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहे. कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही क्षणात हा प्रकार घडल्यानं नववधू व लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही जोरदार धक्का बसला.
मुंबई - वांद्रे कोर्टात लग्न करून पत्नीसह निघालेल्या नवरदेवाला पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात बेड्या ठोकल्या. नवरदेव व त्याच्या मित्राने मोबाइल चोरी केल्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर पोलिसांनी नवरदेवाला अटक केली. अजय धोटे असं अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहे. कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही क्षणात हा प्रकार घडल्यानं नववधू व लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही जोरदार धक्का बसला.
लग्नाच्या आदल्या रात्री अजय व त्याचा साथीदार अल्ताफ या दोघांनी चेंबूरमधील अमर महल सिग्नलजवळ रात्री साडे नऊच्या सुमारास महिलेचा फोन हिसकावून पळ काढला होता. महिलेनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चोरांच्या बाईकचा नंबर सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत होता. पोलिसांनी बाईकच्या नंबरवरून तपासाला सुरुवात केली व बाइकस्वाराचे नाव व पत्ता शोधून काढला. मोबाईल हिसकावून फरार होणार आरोपी अजय धोटे हा वांद्रे कोर्टात लग्न करत असल्याची माहिती मिळताच पोलीस कोर्ट परिसरात पोहोचले. पोलिसांनी आरोपी अजय धोटे व त्याचा साथीदार अल्ताफ मिर्झाला अटक केली आहे.