हर्बल बियांपाठोपाठ हर्बल ऑइल विक्रीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 12:58 AM2019-12-21T00:58:23+5:302019-12-21T00:59:05+5:30

आरोपी जाळ्यात : सायबर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक

After Herbal Seeds, on the name of Herbal oil sale crores duped | हर्बल बियांपाठोपाठ हर्बल ऑइल विक्रीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा

हर्बल बियांपाठोपाठ हर्बल ऑइल विक्रीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा

Next

मुंबई - हर्बल बियांपाठोपाठ आता भारतात हर्बल ऑइल खरेदी करून परदेशात विक्री करण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांसह चौकडीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नायजेरियन नागरिक अ‍ॅन्थोनी गाजी (२७), विल्यम इगेह ऊर्फ विल्ली (४९) यांच्यासह दिलावर शेख नूरमोहम्मद शेख (२१), मंजू नूरमोहम्मद शेख (२०) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे फेसबुकवरून नागरिकांशी संपर्क साधत होते. त्यात ते परदेशी नागरिक असल्याचे भासवून विश्वास संपादन करायचे. सावज जाळ्यात येताच त्यांना हर्बल ऑइल भारतात खरेदी करून ते परदेशात विकल्यास जास्तीचा फायदा होण्याचे आमिष दाखवत होते.

अशाच प्रकारे त्यांनी तक्रारदार व्यावसायिकाशी ओळख केली. त्यांनीही आरोपींवर विश्वास ठेवून ५ लाख ५८ हजार रुपयांची गुंतवणूक केली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

त्यानुसार, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक पद्धतीने केलेल्या तपासात पथक चौकडीपर्यंत पोहोचले. त्यानुसार, चौघांनाही नालासोपारा आणि नवी मुंबईतूनअटक करण्यात आली आहे.

अटक आरोपींकडून १५ मोबाइल, ३ लपटॉप, पाच इंटरनेट डोंगल, ३ पेनड्राइव्ह हस्तगत करण्यात आले आहेत. या चौकडीने अशा प्रकारे देशातील विविध राज्यांतील व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे यात फसलेल्यांनी पोलिसांत तक्रार देण्यास पुढे यावे, शिवाय अशा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अशा प्रकारे इतर नागरिकांची फसवणूक झाली आहे का? या दिशेनेही पोलीस तपास करणार आहेत. समाजमाध्यमातून फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे असे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना या क्षेत्रातील तज्ज्ञांचीही मदत घ्यावी लागते.

Web Title: After Herbal Seeds, on the name of Herbal oil sale crores duped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.