‘ते’ गाणे ऐकताच तरुणाच्या मनात आला आत्महत्येचा विचार; नांदेड जिल्ह्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 10:40 AM2022-02-15T10:40:56+5:302022-02-15T10:41:05+5:30
हंगेरियन गाणे ऐकून ढासळले मानसिक संतुलन, तरुणावर मानसोपचार सुरू
शिवराज बिचेवार
नांदेड : एखादं चांगलं गाणं किंवा संगीत ऐकलं की, कितीही ताणतणाव असला तरी आपलं मन प्रसन्न होतं. सुख-दु:खाच्या प्रत्येक प्रसंगात गाणी आपल्याला साथ करत असतात; पण एखादं गाणं ऐकल्यावर आत्महत्येचा विचार मनात येतो, असं कुणी सांगितलं तर...? विश्वास बसणार नाही; पण असा प्रकार घडलाय एका हंगेरियन गाण्याच्या बाबतीत. मुदखेड तालुक्यातील एका तरुणाने नैराश्यात असताना हे हंगेरियन गाणं ऐकलं आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्याच्यावर आता मानसोपचारतज्ज्ञ उपचार करत आहेत.
हंगेरीतील संगीतकार रेजसो सेरेस यांनी पहिल्या महायुद्धानंतर १९३३ मध्ये ‘सॅड संडे’ अर्थात ‘ग्लुमी संडे’ नावाचे गाणे तयार केले होते. हे गाणे प्रेमभंगावर आधारित होते. हे गाणे हृदयाला एवढे भिडणारे आहे की, ऐकणाऱ्याच्याही वेदना त्यामुळे ताज्या होतात. हे गाणे ऐकून अनेकांनी त्या काळात आत्महत्या केल्या होत्या. परिणामी या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती; परंतु नंतर ही बंदी उठविण्यात आली. त्यानंतर हे गाणे रिकंपोझही करण्यात आले; परंतु तरीही आत्महत्येचे सत्र थांबले नाही.
नेमके हेच गाणे मुदखेड तालुक्यातील एका तरुणाने ऐकले. तो व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यातून त्याचे शिक्षण सुटले आणि तो नैराश्यात गेला होता. त्यात त्याने यूट्यूबवर हिंदी भाषेत भाषांतरित केलेले हे हंगेरियन गाणे ऐकले. गाणे ऐकल्यापासून त्याच्या मनात सारखे आत्महत्येचे विचार येऊ लागले. कुटुंबीयांना ही माहिती समजल्यानंतर त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी दाखल केले; परंतु आताही या गाण्याची केवळ धून वाजली तरी, त्याला दरदरून घाम येतो. तो ओरडायला लागतो.
नैराश्यग्रस्त असणाऱ्या किंवा अगोदरच मनात आत्महत्येसारखे विचार येत असलेल्या व्यक्तीने हे गाणे ऐकल्यानंतर नैराश्य आणि आत्महत्येचे विचार बळावू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी हे गाणे ऐकू नये. - डॉ. रामेश्वर बाेले, मानसोपचार तज्ज्ञ
प्रेमभंग झाल्याने तयार केले गीत
रेजसो सेरेस हे एक पियानो वादक होते. त्यात करिअर करण्याची त्यांची इच्छा होती. त्यात यश न मिळाल्याने प्रेयसीने सेरेसची साथ सोडली. प्रेमभंग झाल्यामुळे तिच्या आठवणीत सेरेसने हे गीत लिहिले होते. या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली; पण त्याचबरोबर आत्महत्याही वाढल्या.
गुगलवरही येते सूचना
हंगेरियन सॅड साँग सर्च करीत असताना गुगलवरही एक सूचना येते. हे गाणे ऐकल्यानंतर शरीराला इजा किंवा आत्महत्या करण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे स्वत:च्या जबाबदारीवर हे गीत ऐकावे, अशी सूचना येते.