भांडण झालेल्या शेजारच्या मुलीसोबत खेळल्याने मावस आजीने चिमुरडीला दिले झाऱ्याने चटके
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 03:46 PM2021-01-06T15:46:55+5:302021-01-06T15:47:08+5:30
९ वर्षांच्या चिमुरडीच्या हाता पायाला, तोंडाला आणि गालाला भाजले आहे.
पिंपरी : भांडण झालेल्या शेजारच्या मुलीसोबत खेळल्याचा राग आल्याने ९ वर्षांच्या चिमुरडीला मावस आजीने झाऱ्याने चटके दिले. यात मुलीच्या हाता पायाला, तोंडाला आणि गालाला भाजले आहे.
जडिता विश्वनाथ वाघमारे (वय ७०, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सारिका प्रदीप गायकवाड (वय ३३, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. वाघमारे या गायकवाड यांच्या मावस मावशी आहेत. पिडित मुलीच्या त्या आजी लागतात. ही घटना ३० डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास घडली. मावस आजीने दिलेल्या चटक्यामुळे प्राची उर्फ जान्हवी (वय ९) ही मुलगी जखमी झाली आहे.
फिर्यादींच्या मावशीचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीसोबत पूर्वी भांडणे झाली होती. त्यामुळे त्या मुलीबरोबर तू खेळायला जाऊ नको असे मावशी जान्हवीला म्हणत असे. मात्र, त्या नंतरही जान्हवी त्या मुलीबरोबर खेळत असल्याने मावस आजीला त्याचा राग आला. या रागाच्या भरात त्यांनी मोठ्या मुलीला सांगून जान्हवीला घरात आणले. झाऱ्या गरम करुन अंगावर ठिकठिकाणी चटके दिले. यात तिच्या गालाला, तोंडाला आणि हाता-पायाला भाजल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी फिर्यादींच्या मावशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
--------------