पत्नीला भोसकून वृद्धाने स्वत:वरही फिरवला चाकू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 02:23 AM2023-08-27T02:23:00+5:302023-08-27T02:23:14+5:30
कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेज परिसरातील मर्क्युरी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर विष्णुकांत बालूर (७९) व पत्नी शकुंतला (७६) राहतात.
मुंबई : पोटचा पोर विदेशात कुटुंबासह स्थायिक झाल्यावर वृद्ध आई-बाप एकमेकांच्या आधारावर जगत होते. मात्र कसल्याशा आजाराने वृद्ध पत्नीला अंथरुणावर खिळवले, तर पतीला ४० वर्षे पाठीच्या दुखण्याने बेजार केले. या सगळ्याला कंटाळून त्यांनी स्वतःचे आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. मात्र माझ्यामागे माझ्या पत्नीचे काय? असा विचार करून आधी तिची हत्या करत नंतर स्वतःलाही संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेज परिसरातील मर्क्युरी इमारतीत तिसऱ्या मजल्यावर विष्णुकांत बालूर (७९) व पत्नी शकुंतला (७६) राहतात. बालूर एका खासगी कंपनीतून सीईओ म्हणून निवृत्त झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली असून, मुलगा २५ वर्षांपूर्वी अमेरिकेला जाऊन स्थायिक झाला. त्यांनी अनिता थोरात (४०) या महिलेला दोन दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांच्या मासिक पगारावर ठेवले होते. शकुंतला यांना जेवण, औषधे देणे व स्वच्छता करण्याची जबाबदारी दिली. त्यांच्याकडे अजून दोन महिलाही काम करतात.
थोरातने पोलिसांना सांगितले की, त्या शुक्रवारी सकाळी ८च्या सुमारास बालूर यांच्या घरी गेल्या, मात्र बेल वाजवूनही काही प्रतिसाद न आल्याने चौकीदाराला बोलावले. तेव्हा त्याने दार ठोकायच्या आधीच आजोबांनी दरवाजा उघडला. चौकीदार आत गेला व थोड्या वेळाने घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आल्यावर मला समजले की वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. चौकीदाराने शेजाऱ्यांना कळवून त्यांच्या मदतीने जखमी जोडप्याला रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी बालूरविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुलाला कळवले आहे. बालूर यांच्यावर शताब्दी तर शकुंतलांवर सेव्हन स्टार रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे, असे समतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण राणे यांनी सांगितले.
...आणि ते खाली कोसळले
बालूरनी शुक्रवारी पहाटे ३च्या सुमारास शकुंतलांच्या डोक्यावर व कानावर चाकूने ६ ते ७ वेळा वार केले. नंतर त्याच चाकूने स्वतःचाही गळा चिरण्याचा प्रयत्न केला.
मी पार कंटाळलो होतो..
पाठदुखी व त्यात रात्री-बेरात्री पत्नीची सुश्रूषा करावी लागे, याला कंटाळलो. पण स्वतःला संपविले तर बायकोला कोण बघणार या काळजीने तिची हत्या करून मग स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली.