ब्रेकअपनंतर फेक व्हिडिओ व्हायरल करण्याची मुलीला धमकी, गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Published: September 10, 2023 01:49 PM2023-09-10T13:49:50+5:302023-09-10T13:50:31+5:30
याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी मंगेश विठ्ठलराव दारोकार (२५, रा. महादेवखोरी) याच्याविरूद्ध विनयभंग व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
अमरावती: अल्पवयीन मुलीशी ब्रेकअप झाल्यानंतर देखील तिचा पाठलाग करत तिला फेक व्हिडिओ व्हायरल करण्याची गर्भित धमकी देण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी मंगेश विठ्ठलराव दारोकार (२५, रा. महादेवखोरी) याच्याविरूद्ध विनयभंग व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगी व आरोपी हे परस्परांच्या ओळखीचे आहेत. काही महिन्यांपुर्वी आरोपी मंगेशने तिला प्रपोझ केले. त्यामुळे पुढे त्यांच्यात मोबाईल चॅटिंग सुरू झाली. सोशल मिडियावर देखील संवाद वाढला. ते युगूल कॅफेमध्ये भेटत होते. मात्र, मागील तिन चार महिन्यांपुर्वी अंदाजे मे महिन्यांपासून त्यांनी एकमेकांसोबत बोलत बंद केले. त्यामुळे आरोपीने तिला तुझा फेक व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी देवून शिवीगाळ केली. फिर्यादी अल्पवयीन मुलीने बोलणे टाळले असता त्याने महादेवखोरी पुलापासुन राजापेठपर्यंत तिचा ट्युशनला जात असतांना पाठलाग केला.
"मला थोडे पैसे दे"
दरम्यान ६ सप्टेंबर रोजी दुपारी आरोपी मंगेशने तिला व्हॉट्सॲपवर मेसेज करत तिला एका ठिकाणी बोलावून घेतले. त्याने तिला थोडे पैसे दे, अशी मागणी केली. त्यावर तिने नकार दिला असता आरोपीने भांडण सुरू केले. ८ सप्टेंबर रोजी त्याने तिला पुन्हा प्रशांत नगर गार्डनलगतच्या कॅफेमध्ये भेटायला बोलावले. भीतीपोटी ती गेली देखील. मात्र ती व तो तिच्या बहिणीला दिसून आले. त्यामुळे बहिणीने त्यांना जाब विचारला. सबब, पिडित अल्पवयीन मुलीने संपुर्ण घटनाक्रम आई-वडील व बहिणीकडे कथन केला. त्यानंतर तक्रार नोंदविली गेली.