दोन महिन्यांनी सापडला, मात्र बालगृहातून पुन्हा पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 02:55 AM2019-06-27T02:55:22+5:302019-06-27T02:55:39+5:30
चेंबूरच्या बालगृहातून बेपत्ता झालेल्या मुलाचा दोन महिन्यांनी शोध घेत, त्याला पुन्हा बालगृहात पाठविले. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो पुन्हा बालगृहातून बेपत्ता झाला.
मुंबई : चेंबूरच्या बालगृहातून बेपत्ता झालेल्या मुलाचा दोन महिन्यांनी शोध घेत, त्याला पुन्हा बालगृहात पाठविले. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशीच तो पुन्हा बालगृहातून बेपत्ता झाला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस अधिक तपास करत आहेत.
चेंबूरच्या बालगृहातील सुरक्षारक्षक जितेंद्र सोलंकी (४९) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २३ जून रोजी सायंकाळी ७ ते ८ या जेवणाच्या वेळेत मुलांची हजेरी घेतली असता, १२९ मुले हजर होती.
जेवणानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा हजेरी घेतल्यानंतर एक १६ वर्षीय मुलगा कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार केली.
त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ४ आॅक्टोबर, २०१४ रोजी या मुलाला संस्थेत दाखल करण्यात आले. त्यानंतर, २ एप्रिल, २०१९ रोजी तो तेथून पळून गेला. २२ जून रोजी तो सापडला. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा बालगृहात दाखल करून घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दुसºयाच दिवशी तो पुन्हा पळाला. पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानकांवर त्याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.