रानडुक्करांच्या शिकारीनंतर 'अविनाश'ने मारली 'टायगर हंटींग'ची मजल; विविध साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 01:52 PM2022-08-16T13:52:15+5:302022-08-16T13:53:16+5:30
वन कोठडी दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून वाघाला ठार करण्यासाठी वापरण्यात आलेले विविध साहित्य जप्त केले आहे.
- महेश सायखेडे
वर्धा : शेत शिवारातील तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून छुप्या पद्धतीने रानडुक्करांची शिकार करूनही वनविभागाच्या गळाला न लागल्यामुळे मनोधैर्य वाढलेल्या अविनाश भारत सोयाम (३४) रा. महालगाव (खुर्द) ता. वरोरा जि. चंद्रपूर याने जंगली वराहांना ठार करण्यासाठी वापरलेल्या युक्तीचा वापर थेट वाघाची शिकार करण्यासाठी केल्याचे वनविभागाच्या चौकशीत पुढे आले आहे. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव शिवारातील झुडपी जंगलात तुकड्या तुकड्यांतील वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यावर वनविभागही ॲक्शनमोडवर आला.
शिकारीचा अंदाज बाळगून वनविभागाने अवघ्या काही तासांतच या गुन्ह्याचा छडा लावत पट्टेदार वाघाची शिकार करीत वाघाच्या मृतदेहाचे तुकडे करणारा मुख्य आरोपी अविनाश भारत सोयाम याला अटक करीत त्याची तीन दिवसीय वन कोठडी मिळविली आहे. वन कोठडी दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून वाघाला ठार करण्यासाठी वापरण्यात आलेले विविध साहित्य जप्त केले आहे. यात लोखंडी तार, वायर, अवैध वीज जोडण्यासाठी वापरण्यात येणारा आकडा आदीचा समावेश आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपीला आणखी काही व्यक्तींनी सहकार्य केल्याचा अंदाज वनविभागाला असून गोपनीय पद्धतीने माहिती घेत इतर आरोपींचा शोध सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
अविनाशकडे आहे दहा एकर शेती
तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून वाघाची शिकार करून वाघाच्या मृतदेहाचे तुकडे करीत त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील अविनाश सोयाम याला अटक केली आहे. अविनाश याने ज्या ठिकाणी वाघाची शिकार केली ती मौजा महालगाव सर्वे क्रमांक ८२ व ८३ ही शेतजमीन सोयाम याच्या नावाने आहे. या एकूण दहा एकर शेत जमिनीवर सोयाबीन व कपाशीची लागवड करण्यात झाली आहे, हे विशेष.
महावितरणकडून प्राप्त झाला अहवाल
या गुन्ह्याच्या संदर्भातील अधिकची ठोस तांत्रिक माहिती मिळावी या उद्देशाने समुद्रपूर वनविभागाच्या वतीने महावितरणकडे काही माहिती मागितली. महावितरणकडून तांत्रिक माहिती संदर्भातील अहवाल समुद्रपूर वनविभागाला प्राप्त झालेला आहे. हा अहवाल या गुन्ह्याच्या संदर्भाने महत्त्वाचाच असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
आरोपीचे पाहिजे तसे सहकार्य नाहीच
वाघाची शिकार करून वाघाच्या मृतदेहाची निर्दयतेने तुकडे करणारा अविनाश भारत सोयाम सध्या वनकोठडीत असून त्याच्याकडून वनविभागाचे अधिकारी गुन्ह्याच्या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण आरोपी तपासी अधिकाऱ्यांना पाहिजे तसे सहकार्यच करीत नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
आरोपीने तीन ठिकानांचा केला वापर
वरोरा तालुक्यातील मौजा महालगाव सर्वे क्रमांक ८२ व ८३ मधील शेतजमिनीवरील तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून पट्टेदार वाघाची शिकार केली. त्यानंतर आरोपीने वाघाचा मृतदेह याच मौजातील ८१ क्रमांकाच्या पडीक शेतजमिनीवर नेला. तेथे सुरूवातीला वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पण यश न आल्याने वाघाचा मृतदेह थेट वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा नजीकच्या पवनगाव मौजातील झुडपी जंगलात आणल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.