ज्याच्याविरोधात शंभरहून अधिक गुन्हे, त्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By मुरलीधर भवार | Published: April 25, 2024 03:31 PM2024-04-25T15:31:41+5:302024-04-25T15:31:56+5:30
१० एप्रिल रोजी गुजरात पोलिस रामविलास गुप्ता नावाच्या एका आरोपीला ठाण्यात एका तपासानिमित्त घेऊन आली होती
कल्याण - देशभरात शंभरहून जास्त चोरीचे गुन्हे असलेल्या कुख्यात चोरटा गुजरात पोलिसांच्या ताब्यातून निसटला होता. रामविलास गुप्ता या चोरट्याच्या शोधात सहा राज्याची पोलिस आहे. कल्याण नजीक एका ढाब्यावर रामविलास बसला आहे. याची माहिती मिळताच कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस अवघ्या १२ मिनीटात त्या ढाब्यावर पोहचले. त्यांनी रामविलासला ताब्यात घेतले.
१० एप्रिल रोजी गुजरात पोलिस रामविलास गुप्ता नावाच्या एका आरोपीला ठाण्यात एका तपासानिमित्त घेऊन आली होती. संधीचा फायदा घेत रामविलास गुजरात पोलिसांच्या तावडीतून निसटला. रामविलास गुप्ता हा कुख्यात चोरटा आहे. उत्तर प्रदेशात राहणारा रामविलास गुप्ता याने देशभरात चोरीचे गुन्हे केले आहेत. शंभरहून जास्त गुन्हे रामविलास याच्या विरोधात दाखल आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या राज्यात तो अनेक गुन्ह्यात फरार आहे.
एवढा मोठा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याने त्याच्या शोधात अनेक पोलिस पथके काम करीत होती. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांना पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी दिनकर पगारे यांनी रामविलास बद्दल एक माहिती दिली. कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिनकर पगारे यांचे पोलिस पथक कल्याणनजीक म्हारळ परिसरातील एका ढाब्यावर पोहचले.
रामविलास त्याठिकाणी कोणाच्या तरी प्रतिक्षेत बसला होता. रामविलास परत पसार होऊ नये यासाठी पोलिसांनी चारही बाजूंनी त्याला घेरले. पोलिस कर्मचारी सुशील हांडे, सचिन कदम अन्य सात पोलिसांनी रामविलास याच्यावर झडप घातली. रामविलासला ताब्यात घेतले. आपण पकडले गेलो आहे हे पाहून त्याच्या पायाखालची वाळू सरकली. सध्या त्याला पुन्हा गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रामविलासने चोरी केलेल्या पैशातून उत्तर प्रदेशात एक मोठा बंगला बांधला आहे. त्याच्याकडे दुचाकी आणि चार चाकी ढिगभर गाड्या आहे.