अशी होती चोरीची पद्धत; वय 13 वर्षे, पगार 18 लाख, काम : लग्नात चोरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 09:28 AM2023-02-17T09:28:45+5:302023-02-17T09:29:03+5:30
आई - वडिलांनीच ढकलले गुन्हेगारीच्या दलदलीत
बुंदी : गुन्हेगारीच्या दलदलीत आपल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आई - वडिलांनीच ढकलल्याचे एक धक्कादायक प्रकरण राजस्थानात घडले आहे. १३ वर्षे वयाचा मुलगा विवाह समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींच्या बॅगांची, त्यातील मौल्यवान ऐवज, दागदागिन्यांची चोरी करायचा. त्यापायी त्याला वर्षाला १८ लाख रुपये मिळायचे. या मुलाने महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, हरयाणा या राज्यांत अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
हा अल्पवयीन आरोपी मध्य प्रदेशचा मूळ रहिवासी असून, त्याचे इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण झाले आहे. आतापर्यंत त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. चोरीसाठी तो नेहमी प्रवास करायचा. त्यातून जसा वेळ मिळेल तसे आई-वडिलांना भेटायला यायचा. त्याच्या प्रवासाची, खाण्या - पिण्याची, कपडालत्त्याची सर्व जबाबदारी चोरांच्या टोळीने घेतली होती.
लक्झरी कारने करायचा प्रवास
n ज्या विवाह समारंभात चोरी करायची तिथे या अल्पवयीन चोराला लक्झरी गाडीतून नेले जात असे. त्याच्याकडे उत्तम कपड्यांचे दहा - बारा जोड होते.
n एखाद्या ठिकाणी चोरी करताना घातलेले कपडे तो दुसऱ्या ठिकाणी वापरत नसे. हा मुलगा व त्याचे साथीदार कोणत्याही हॉटेलमध्ये उतरत नसत.
n ते आपल्या गाडीतच झोप घेत. राजस्थानातील बुंदी येथे या मुलाने एका विवाह समारंभातून १७ लाखांच्या दागिन्यांची चोरी केली होती. मात्र, ९ फेब्रुवारी रोजी बुंदी येथेच चोरी करताना वऱ्हाडी मंडळींनी या मुलाला पक़डले.
...अशी होती चोरी करण्याची पद्धत
चोरांच्या टोळीचा प्रमुख कुठे चोरी करायची हे ठिकाण निश्चित करत असे. त्यानंतर हा मुलगा एखाद्या विवाह समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींच्या बॅगांची नीट माहिती काढत असे. त्यातील रोख रक्कम, दाग-दागिने असलेली बॅग उचलून पसार होत असे. हे दागिने तो आपल्या टोळीकडे देत असे. मग ते त्या मौल्यवान ऐवजाची विल्हेवाट लावत.